एनएमएमएस शिष्यवृत्तीत कष्टकऱ्यांच्या मुलांना संधी

प्रकाश कोकितकर
मंगळवार, 3 जुलै 2018

सेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होत आहेत. 

सेनापती कापशी - केंद्र सरकारच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी ठरली आहे. यावर्षीपासून चार वर्षांत ४८ हजार रुपये मिळवून देणारी ही शालेय स्तरावरील एकमेव स्पर्धा परीक्षा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने यशस्वी होत आहेत. 

दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांसाठी ही परीक्षा म्हणजे सुवर्णसंधी आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २००८-०९ पासून ही परीक्षा सुरू झाली. त्यात सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात मार्गदर्शनाचे नेटके नियोजन होत असल्याने येथील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामधील पात्र विद्यार्थ्यांना चार वर्षांत २४ हजार रुपये मिळत होते. आता ही रक्कम वाढली असून ती नववी ते बारावी या काळात प्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे ४८ हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शिष्यवृत्ती देणारी ही स्पर्धा परीक्षा ठरली आहे. 

जिल्ह्यातील ४४८ विद्यार्थी गुणानुक्रमे निवडले जातात; तर वाढत्या गुणवत्तेमुळे जिल्ह्यातील यापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिल्लक कोट्यातून संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून जादा करून घेतलेला सराव, शिष्यवृत्तीची रक्कम आणि शाळांचा वाढता सहभाग यामुळे ग्रामीण मुले यामध्ये अधिक चमकत आहेत. ही योजना केवळ मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच असून विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही. 

एनएमएमएस व इतर शिष्यवृत्ती परीक्षेमुळे विद्यार्थ्यांत स्पर्धेबाबत जागृती होते. या सरावातून राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोग अशा स्पर्धा परीक्षांमधील कोल्हापूरचा टक्का वाढविण्यात शिक्षकांनी योगदान द्यावे. आजवरचे निकाल पाहिले तर या शिष्यवृत्तीत अव्वल असणारा जिल्हा स्पर्धा परीक्षेतही आघाडी घेईल.
- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर

दृष्टिक्षेपात शिष्यवृत्ती
 नववी ते बारावीसाठी प्रतिवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती 
 शालेय स्तरावरील अल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक शिष्यवृत्ती रक्कम
 जिल्ह्यातील ४४८ विद्यार्थी गुणानुक्रमे निवडले जातात. 
 काही विद्यार्थ्यांना शिल्लक कोट्यातून मिळते संधी

Web Title: NMMS Scholarship Student Education