मुश्रीफांशी मैत्रीचे 'ऍग्रीमेंट' नाही - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

गडहिंग्लज - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन अनेक निवडणुका लढल्या खऱ्या; परंतु काही निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावरही लढल्या आहेत.

गडहिंग्लज - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन अनेक निवडणुका लढल्या खऱ्या; परंतु काही निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावरही लढल्या आहेत.

आमदार हसन मुश्रीफ व आमची राजकीय मैत्री असली तरी तशी कायमची "ऍग्रीमेंट' केलेली नाही, असे स्पष्टीकरण आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भूमिका मांडण्यासाठी येथील हॉटेल साईप्लाझामध्ये कॉंग्रेसची पत्रकार परिषद झाली. जिल्ह्याच्या राजकारणात श्री. मुश्रीफ व आपली राजकीय मैत्री पाहता गडहिंग्लज पालिका निवडणुकीतही आपण राष्ट्रवादीबरोबर राहणार काय? या प्रश्‍नावर उत्तर देताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यातून कोणीही कॉंग्रेसला "गृहित' न धरण्याचे संकेत दिले.

दरम्यान, गडहिंग्लज पालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असून, समविचारी पक्षांशी आघाडीच्यादृष्टीनेही चर्चेची दारे खुली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

श्री. पाटील म्हणाले, 'निवडणुकांच्या माध्यमातून कॉंग्रेसची विचारधारा व पक्षाचे चिन्ह तळागाळापर्यंत पोचवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहे; परंतु ज्या ठिकाणी स्वबळावर शक्‍य नाही, तेथे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासही सांगितले आहे. यामुळे गडहिंग्लज पालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसने सर्व 17 जागांची तयारी केली आहे. इच्छुकांची यादीही तयार करण्याची सूचना दिली आहे. गत निवडणुकीत चार जागा घेऊन आम्ही आघाडी केली होती. यातील दोन उमेदवार अवघ्या शंभरभर मतांनी पराभूत झाले. म्हणूनच प्राथमिक टप्प्यात पक्षाने सर्व जागांवर लढवण्याची तयारी केली आहे.''

तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील यांनी स्वागत केले. गोडसाखरचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे, प्रा. किसनराव कुराडे, अंजना रेडेकर, संतान बारदेस्कर, बसवराज आजरी, विद्याधर गुरबे, उमेश आपटे, सागर हिरेमठ, दिग्विजय कुराडे, राजशेखर यरटे, विराप्पा दळवी, प्रशांत देसाई, बाजीराव होडगे, संजय बटकडली, इब्राहिम बेडक्‍याळे आदी उपस्थित होते.

गडहिंग्लजचे राजकारण अस्थिर
आमदार पाटील म्हणाले, 'निवडणुकीच्या तोंडावर गडहिंग्लजचे राजकारण अस्थिर आहे. रोज एक राजकीय चित्र बदलत आहे. काल भाजपात गेलेले, आज दुसऱ्याच विचारात दिसत आहेत. राजकारण अजूनही स्थिर होण्यास तयार नाही. यामुळे कॉंग्रेसची भूमिका "थांबा आणि पाहा' अशी आहे. कॉंग्रेसला कोण सन्मान देतो, हासुद्धा विचार समविचारांशी आघाडी करताना केला जाईल.''

Web Title: no friendship agreement with mushrif