इचलकरंजीत पोलिसांच्या वाहनांना इंधन नाही

राजेंद्र होळकर 
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

वरिष्ठासाठी चालकाची पदरमोड
तीन दिवसांपूर्वी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस वाहनातून कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला अधीक्षक कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी वाटेतच मोटारीतील पेट्रोल संपल्याने चालकाला पेट्रोलसाठी कॅन घेऊन भटकावे लागले. चालकाने अक्षरश: पदरमोड करून गाडीत पेट्रोल टाकले.

इचलकरंजी - देशातील सर्वात संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या इचलकरंजीतील पोलिस वाहनांना इंधन नसल्याने एक फेब्रुवारीपासून वाहने बंद ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पेट्रोलिंग करायचे कसे, हा यक्षप्रश्‍न आहे.

गेल्या काही वर्षांपासून इचलकरंजीत जातीय कारणावरून तणाव निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. गुन्हेगारीतही शहराचा आलेख चढताच राहिला आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस दलाकडून सर्वतोपरी "दक्षता' घेतली जात आहे. शहरातील पोलिस वाहनांना लागणारे डिझेल-पेट्रोल खासगी पेट्रोल पंपावरून पुरविले जाते. या पंपचालकाचे पोलिस दलाने सुमारे पाच महिन्यांपासूनचे पाच लाखांहून अधिक बिल थकविले आहे. त्यापोटी केवळ 9 हजारांचा धनादेश दिला. ही पंपचालकाची क्रूर थट्टाच होय. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंपचालकाने वाहनांना इंधन देणे पूर्णपणे बंद केले आहे. याबाबत येथील पोलिस अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कानावर ही गंभीर बाब घालून पेट्रोल-डिझेलचे थकीत बिल त्वरित पाठवून देण्याविषयी विनंती केली; पण या विनंतीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे दहा दिवसांपासून पोलिस वाहने बंद अवस्थेत ठाण्याच्या आवारात उभी केली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना गस्त घालणे तसेच सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे अवघड झाले आहे. बीट मार्शल मोटारींना पेट्रोल नसल्याने शहरातील गस्त घालण्याचे काम थांबले आहे.

लाखो रुपयांचे बिल थकल्याने पंपमालकाने गाड्यांना डिझेल देणे बंद केले आहे. त्यामुळे डिझेलअभावी एक फेब्रुवारीपासून पोलिस गाड्यांची चाके थांबल्याने गाड्या पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या करून लावल्या आहेत.

वरिष्ठासाठी चालकाची पदरमोड
तीन दिवसांपूर्वी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस वाहनातून कार्यालयीन कामासाठी कोल्हापूरला अधीक्षक कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी वाटेतच मोटारीतील पेट्रोल संपल्याने चालकाला पेट्रोलसाठी कॅन घेऊन भटकावे लागले. चालकाने अक्षरश: पदरमोड करून गाडीत पेट्रोल टाकले.

Web Title: no fuel vehicles police in ichalkaranji