सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेसाठी निधीच नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सोलापूर-उस्मानाबाद या नव्या रेल्वे मार्गाची पाहणी पूर्ण झाली आहे. या मार्गामुळे उद्योग, व्यवसाय वाढतील. प्रवाशांची चांगली सोय होईल. पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांचा दळणवळही वाढेल. हा मार्ग दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- डी. के. शर्मा, सरव्यवस्थापक, मध्य रेल्वे

सोलापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथून थेट मराठवाड्यातील उस्मानाबादला नव्या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग मंजूर होऊन वर्ष झाले तरीही त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून अद्याप दमडीही मिळालेली नाही. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात निधी मिळेल आणि त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल, असा विश्‍वास विभागीय सरव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी व्यक्‍त केला.

सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यातून सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग मागच्या वर्षी मंजूर झाला. तुळजापूरला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोलापुराला येता यावे. सोलापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांना व्यवसायानिमित्त मराठवाड्यात जाता येईल, हा त्यामागे उद्देश होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या रेल्वे मार्गाचे मुंबईत उद्‌घाटनही केले. मात्र, या रेल्वे मार्गासाठी अद्याप निधीच मिळाला नसल्याचे समोर आले आहे.

ठळक बाबी
80 किलोमीटर - रेल्वे मार्ग
953 कोटी रु - रेल्वे मार्गासाठीचा निधी
सात - मार्गावरील स्थानके
327 हेक्‍टर - संपादित होणारी अंदाजे जमीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Fund for Solapur Osmanabad Railway