मीटर नाही, म्हणून कनेक्‍शन नाही 

निवास चौगले-सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

महावितरणलाही प्रतीक्षा : मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने स्थिती 

महावितरणलाही प्रतीक्षा : मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने स्थिती 

कोल्हापूर :  जिल्ह्यात घरगुती वीज कनेक्‍शनसाठी आवश्‍यक मीटरच महिनाभर न आल्याने हजारो ग्राहकांना नव्या कनेक्‍शनची प्रतीक्षाच आहे. मीटरची मागणी जास्त आणि पुरवठाच बंद झाल्याने नव्या घरांची वास्तुशांती लांबणीवर टाकून स्वप्नातील घरात राहायला जाण्याचे स्वप्नही लांबत आहे. 
चार-पाच वर्षांत जिल्ह्यात नवी बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या नव्या घरांना महावितरणचे कनेक्‍शन घेण्यासाठी ग्राहकांकडून पैसे भरून घेतले जातात. मीटर उपलब्ध होतील तशी कनेक्‍शनही जोडली जात होती. महिन्याभरापूर्वी याबाबत काही तक्रारी नव्हत्या; पण महिनाभर नवीन मीटरच उपलब्ध झालेले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ग्राहकांची कनेक्‍शनच जोडलेली नाहीत. 
सिंगल फेज स्वरूपाच्या मीटरची मागणी मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे कळवली जाते. त्यानंतर ही मीटर परिमंडळ कार्यालयाकडे येतात. तेथून प्रत्येक तालुक्‍याच्या मागणीनुसार त्याचे वितरण केले जाते. चार तालुक्‍यांतील एका विभागातच सुमारे 800 ग्राहकांनी मागणी करूनही मीटरअभावी त्यांचे कनेक्‍शन जोडलेले नाही. वीजभार किती यावर संबंधित ग्राहकांकडून महावितरण पैसे भरून घेते. एक किलोवॅटसाठी 1070 रुपये भरून घेतले जातात. ज्या ग्राहकांनी कनेक्‍शनची मागणी केली, अशा सुमारे तीन हजार लोकांनी पैसे भरलेत; पण त्यांना मीटर नसल्याने कनेक्‍शन दिलेले नाही. 
गेल्या दोन-तीन वर्षांत मागेल त्याला तत्काळ कनेक्‍शन असे धोरण महावितरणने राबवले होते. त्यामुळे कनेक्‍शन मिळाले नाही, अशी तक्रार ग्रामीण भागातूनही कधी येत नव्हती. परंतु, गेल्या महिनाभरापासून मीटरची टंचाई भासू लागल्याने नवे कनेक्‍शनच जोडलेले नाहीत. त्यामुळे पैसे भरलेल्या ग्राहकांचे महावितरणचे हेलपाटे सुरू झाले आहेत. शेती वीज पंपासाठी आवश्‍यक मीटरची टंचाई नाही. शेतीसाठी स्वतंत्र फिडर केल्याने भारनियमनाचाही प्रश्‍न निकालात निघाला आहे. 
पैसे भरूनही महिनाभर कनेक्‍शन न मिळाल्याने नव्या घरांची वास्तुशांती लांबली आहे. स्वतःची पुंजी, बॅंकांचे कर्ज काढून अनेकांनी घरे बांधली, तर काहींनी फ्लॅट घेतले. परंतु, तेथे वीज कनेक्‍शन नसल्याने राहायलाही जाता येत नाही. अशा विचित्र कोंडीत नवे घर बांधलेले ग्राहक सापडले आहेत. 

जोडणीसाठी घेण्यात येणारी रक्कम 
1 किलोवॅटसाठी - 1070 रुपये 
1.5 किलोवॅट - 1570 रुपये 
2 किलोवॅट - 2070 रुपये 
 
अधिकारी म्हणतात टंचाई आहे... 
गेल्या महिनाभरापासून मीटरची टंचाई आहे. मुख्य कार्यालयाकडे त्याचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या एक-दोन दिवसांत सुमारे 1800 मीटर आलेली आहेत; पण ती पुरेशी नाहीत. या मागणीचा पाठपुरावा कार्यालयाच्या पातळीवर सुरू असून, प्रलंबित जोडण्या तत्काळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी मागेल त्याला कनेक्‍शन दिले, हीच स्थिती पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणमधील अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
................. 

Web Title: no meter no conection