विद्यार्थ्यांपासून दुधाची भुकटी दूरच

विद्यार्थ्यांपासून दुधाची भुकटी दूरच

कऱ्हाड - शालेय पोषण आहारात दुधाच्या भुकटीचा समावेश करण्यात येणार असल्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने दिले. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज सहा ग्रॅम दूध भुकटी देण्याचे त्यात म्हटले होते. "दूध भुकटी दिवस'ही साजरा करण्याचेही आदेश दिले होते. मात्रस दोन महिन्यांनंतरही दूध भुकटीसंदर्भातील कार्यवाही कागदावरच राहिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

मध्यंतरी राज्यात दूध दराचे आंदोलन पेटले होते. त्यातच अतिरिक्त दूधाचाही प्रश्न निर्माण झाला होता. शेतकरी संघटनांनी सरकारला दूधप्रश्नी धारेवर धरले होते. त्यामुळे शासनाने त्यावर तोडगा काढण्यासाठी काही निर्णय घेतले. त्याचदरम्यान राज्यात दुधाची भुकटी मोठ्या प्रमाणात शिल्लक होती. ती भुकटी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून वाटप केली, तर त्याचा त्यांनाही फायदा होऊन भुकटीचाही मोठा उठाव होईल, या हेतूने शासनाने शालेय पोषण आहारांतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दूध भुकटी देण्याची घोषणा केली. शालेय शिक्षण विभागाने त्या संदर्भातील अद्यादेशही जारी केला. एका विद्यार्थ्याला दिवसाला सहा ग्रॅम दूध भुकटी, अशी दर महिन्याला 200 ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट दिले जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत 600 ग्रॅम दूध भुकटीचे पाकिटे देऊन "दूध भुकटी दिवस' साजरा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील आदेश 23 ऑगस्टला राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. त्याला आता दोन महिने झाले, तरीही प्रत्यक्षात कार्यवाही कागदावरच राहिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूध भुकटी कधी मिळणार हा प्रश्नच आहे. 

सहा ग्रॅमवरच विद्यार्थ्यांची बोळवण 
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत दिवसाला सहा ग्रॅम दूध भुकटी देण्यात येणार आहे. त्या भुकटीतून किती दूध तयार होणार, याबाबत काहीच स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना दर दिवसाला किती दूध दिले जावे, याचीही स्पष्ट सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सहा ग्रॅम दूध भुकटीवरच बोळवण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com