युतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही

युतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे. पत्रिकेत ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचेच नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ‘आमची तुम्हाला गरज नाही का?’ असा सवाल उपस्थित करीत चूक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. 

युतीच्या प्रचाराचा प्रारंभ रविवारी (ता. २४) कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होत आहे. सायंकाळी पाचला होणाऱ्या प्रचार प्रारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, संपर्क नेते अरुण दुधवडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या युतीच्या पातळीवर सुरू आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून युतीत मानापमान नाट्य रंगले आहे. 

युतीच्या जाहीर सभेसाठी ‘चलो तपोवन मैदान’ असा आशय असलेल्या या निमंत्रण पत्रिकेवर ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचेच नाव नाही. श्री. घाटगे हे कागलचे, युतीचे लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक हेही कागलचे आणि त्याचवेळी श्री. घाटगे यांचे विधानसभेचे संभाव्य विरोधक माजी आमदार संजय घाटगे व त्यांचे पुत्र अंबरिश यांची मात्र नावे पत्रिकेत ठळक आहेत.

राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमध्ये पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला महत्त्व आहे. त्यातून राजे गटाच्या कार्यकर्त्यांना हे लक्षात आल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. विशेषतः कागल तालुक्‍यात सोशल मीडियावर मेसेजनी धुमाकूळ घातला आहे. ‘पत्रिकेत राजेंचे नाव घाला, अन्यथा वेगळा विचार करू’, ‘पहिल्यांदा नाव का वगळले ते जाहीर करा, नाहीतर योग्य तो विचार करू’ अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर पाठवून राजे समर्थक राग व्यक्त करीत आहेत.

शौमिका, अमल यांचेही नाव नाही
भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका यांचेही नाव या निमंत्रण पत्रिकेत नाही. गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीला या दोघांनीही हजेरी लावली होती. त्या वेळी हे दोघेही युतीचा प्रचार करतील, अशी घोषणा श्री. पाटील यांनी केली होती. तथापि, या निमंत्रण पत्रिकेतून त्यांचीही नावे वगळली आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com