महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये नाही "नोटा'

प्रशांत देशपांडे
मंगळवार, 16 जुलै 2019

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला मतदान करू न इच्छिणाऱ्या मतदारांसाठी "नोटा' पर्याय असतो. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक निवडणुकीत लाखोंच्यावर मते "नोटा' या पर्यायाला पडत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, महाविद्यालयीन निवडणुकीत तो पर्यायच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

सोलापूर - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारसंघातील कोणत्याही उमेदवाराला मतदान करू न इच्छिणाऱ्या मतदारांसाठी "नोटा' पर्याय असतो. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक निवडणुकीत लाखोंच्यावर मते "नोटा' या पर्यायाला पडत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, महाविद्यालयीन निवडणुकीत तो पर्यायच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

महाविद्यालयीन निवडणुकांसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाणार आहे. राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील 12 लाखांहून अधिक विद्यार्थी या महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी ईव्हीएमची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सूचना, तक्रारींसंदर्भात बुधवारी (ता. 17) राज्यस्तरीय बैठक होणार असल्याने या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

तब्बल 27 वर्षांनंतर प्रथमच महाविद्यालयीन निवडणुका होत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत "नोटा' पर्याय असतो. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीतही तो असायला हवा होता. मात्र, तो पर्याय नसला तरीही सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा.
- गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय, सोलापूर

महाविद्यालयांत खुल्या पद्धतीने निवडणूक होत असल्याने खूप वर्षांनंतर विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. बहुतेक विद्यार्थ्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांना त्याची उत्सुकता आहे. या निवडणुकीतील चुकांची दुरुस्ती पुढील निवडणुकीत करता येईल. "नोटा' पर्याय असायला हवा परंतु, नसला तरीही चालेल.
- मल्लेश कारमपुरी, सचिव, एसएफआय, सोलापूर

निवडणुकीत "नोटा' असावा, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे; परंतु महाविद्यालयांत 27 वर्षांनंतर प्रथम निवडणुका होत असल्याने लोकशाहीच्या उत्सवात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची गरज आहे. सक्षम उमेदवाराच्या पाठीशी विद्यार्थ्यांनी उभे राहावे.
- मयूर जव्हेरी, उत्तर सोलापूर प्रमुख, अभाविप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Nota Button in College Election