तरुणाईत "नो शेव्ह नोव्हेंबर'ची क्रेझ...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

कोल्हापूर - जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. सरता नोव्हेंबर जगभरातील तरुणाईने "नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणून साजरा केला आणि त्यात येथील तरुणाईही सहभागी झाली. त्यासाठी सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स उपलब्ध केल्या. 

कोल्हापूर - जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. सरता नोव्हेंबर जगभरातील तरुणाईने "नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणून साजरा केला आणि त्यात येथील तरुणाईही सहभागी झाली. त्यासाठी सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स उपलब्ध केल्या. 

तारुण्याच्या उंबरठ्यावर ओठावर मिशा आल्या की मिशा आणि दाढी ठेवणं, त्यातही स्टाईल जपणं ही कोल्हापूरची खासियत. पण गेल्या काही वर्षांत विविध सेलिब्रिटींचे अनुकरण करत "चकाचक दाढी-मिशा' ही क्रेझही वाढली. मात्र सोशल मीडियावरून "नो शेव्ह नोव्हेंबर' कॅम्पेनने जोर धरला. दाढी-मिशांच्या विविध स्टाइल्स, आकर्षक रंगांनी त्या चमकवल्याचे फोटो शेअर होऊ लागले आणि त्याला पाठिंबा देत अनेक तरुणांनी चक्क महिनाभर दाढी-मिशा ठेवल्या. 

मुळात जगभरात हे कॅम्पेन सुरू होण्यामागची भूमिका वेगळी आहे. नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता त्यावर खर्च होणारे पैसे कर्करोगाशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी देणं हा या कॅम्पेनचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील विविध देशांत हे कॅम्पेन सुरू असले तरी सोशल मीडियामुळे आता ते तळागाळापर्यंत पोचले आहे. त्याचाच परिणाम यंदा कोल्हापुरातील तरुणाईमध्ये जाणवला. साहजिकच महाराजा शेव्हिंग कट, मस्केटियर लुक, सोल पॅच, "बाजीराव-मस्तानी'मधील रणवीर सिंगची मिश्‍यांची स्टाइल आणि वाइल्ड वेस्ट स्टाईल हे ट्रेंडस्‌ कोल्हापुरातही अनुभवायला मिळाले. त्याशिवाय नव्या लुकला सूट होणारी हेअर स्टाईलही करून घेण्यावर अनेकांनी भर दिला. 

अशी आहे संकल्पना 

आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सर याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने परदेशात गेली चार-पाच वर्षे "नो शेव्ह नोव्हेंबर' ही संकल्पना रुजली आहे. कर्करुग्णांवर उपचारादरम्यान केस गळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या महिन्यात दाढी न करता त्यावर खर्च होणारे पैसे कर्करुग्णांच्या मदतीसाठी देणे, अशी ही संकल्पना आहे. 

सोशल मीडियामुळे यंदा येथील तरुणाईत दाढी-मिशा वाढवण्याची क्रेझ वाढली. पण "नो शेव्ह नोव्हेंबर'ची मूळ संकल्पना अनेकांना अजूनही माहिती नाही. ट्रेंडी तरुणाईसाठी मात्र आम्ही अनेक स्टाईल उपलब्ध केल्या आहेत. 

- धनंजय भालेकर, हेअर अफेअर सलून

Web Title: No Shave November youth