पाणीच नाही, पोळ्याला बैलांना कशी अंघोळ घालायची? (व्हिडिओ)

अशोक मुरुमकर
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

बाजारपेठेवर परिणाम 
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 30) काही ठिपाणी श्रावणी बैल पोळा आहे. पाऊस पडेल या आशेने दुकानदारांनी बैलांना सजवण्याचे साहित्य म्हणजे रंग, गोंडे, चंगाळं, सुताची दावी, मोरख्या, हिंगुळ असे साहित्य आणले आहे. पण पाऊसच न आल्याने शेतकरी बाजारत फिरकत नाहीत. त्यामुळे 20 टक्के सुद्धा उलाढाल होत नाही.
- सिद्धेश्‍वर सास्तुरे, व्यापारी, सोलापूर.

सोलापूर : जनावरांना चारा नाही... एका पेंडवर दिवस काढावा लागतोय... मराय झाल्यात जनावरं... काय करणार खाटकाशिवाय कोण घेतंय त्यांना... बैलपोळा करण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही... बैल धुयालासुद्धा पाणी नाही... अशी व्यथा धोत्री, ता. दक्षिण सोलापूर येथील शेतकरी रावसाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे. 
पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळग्रस्त सोलापूरच्या शेतकऱ्यांची व्यथा रावसाहेब जाधव यांनी बोलून दाखविली.

राज्यात एका बाजूला महापूर तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाचे कोरडे ढग आहेत. पावसाळा संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेला बैलपोळा सण कसा करायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे.

जाधव म्हणाले, पाऊस नसल्याने हिरवा चारा नाही. पोळा करण्याची शेतकऱ्याची परिस्थितीत राहिलेली नाही. गेल्या वर्षीच्या शिल्लक कडब्यातून एक दोन पेंड्या टाकतो दिवसभरात जनावरापुढं. हिप्परगा तलावातून जनावरांसाठी गवत काढून नेले जात आहे. पण, त्यातील माशा जनावरांना चावत आहेत. त्यामुळे काही जानावरे दगावलीही आहेत. अशी वेळ कधीच आली नव्हती. पाऊस नसल्याने यंदाच्या पोळ्याला जनावरे धुतली तर धुतली नाही तर, तशीच फक्त पुजा करायची. काय करणार? दिवसच तसे आलेत. त्याला पाठ तर द्यावीच लागणार, असेही भावनिक होऊन जाधव यांनी सांगितले.

बाजारपेठेवर परिणाम 
सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 30) काही ठिपाणी श्रावणी बैल पोळा आहे. पाऊस पडेल या आशेने दुकानदारांनी बैलांना सजवण्याचे साहित्य म्हणजे रंग, गोंडे, चंगाळं, सुताची दावी, मोरख्या, हिंगुळ असे साहित्य आणले आहे. पण पाऊसच न आल्याने शेतकरी बाजारत फिरकत नाहीत. त्यामुळे 20 टक्के सुद्धा उलाढाल होत नाही.
- सिद्धेश्‍वर सास्तुरे, व्यापारी, सोलापूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No water for Bailpola celebration