रक्तातील नात्यांच्या शुभेच्छा मिळाल्याच नाहीत...

रक्तातील नात्यांच्या शुभेच्छा मिळाल्याच नाहीत...
रक्तातील नात्यांच्या शुभेच्छा मिळाल्याच नाहीत...

कोल्हापूर - फोनवरून, व्हॉटस्‌ऍप, फेसबुकवर एकापेक्षा एक लाइक, दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच आज आई-वडील, आजी-आजोबा मात्र दिवाळीच्या शुभेच्छांसाठी आतुरलेले होते. सायंकाळी सूर्यास्तापर्यंत त्यांचे डोळे रस्त्याकडे लागून होते; पण "त्या' आई-वडील, आजी-आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी रक्ताच्या नात्यातील एकही मुलगा-मुलगी, नात-नातू आज फिरकलाही नाही. ज्यांना अंगाखांद्यावर खेळवले, स्वत:च्या गरजा, हौसमौज बाजूला ठेवून त्यांना शिक्षण दिले त्यापैकी एक जणसुद्धा स्वत:च्या आजी-आजोबांना, आई-बाबांना अभ्यंगस्नान घालण्यासाठी सोडाच; पण भेटायलासुद्धा आला नाही. आर.के.नगरच्या मातोश्री वृद्धाश्रमातील ही आजची स्थिती होती.

आर.के.नगरच्या मातोश्री वृद्धाश्रमात आज शंभर वृद्ध आहेत. त्यांच्यापैकी काहींची मुले "बिझनेसमन' आहेत, असे ते आवर्जून सांगतात. त्यांना कसं घडवलं, कसं वाढवलं याचाही पाढा वाचतात. पण आता तो कधीच फिरकत नसल्याचेही सांगतात. पाटोळे कुटुंबीयांनी त्यांना आधार दिला आहे. याच आधारावर आज त्यांची दिवाळी साजरी झाली. पहाटेपासून सुरू असलेले अभ्यंगस्नान तर झालंच; पण ज्यांची ओळख नाही अशा अनेकांनी सर्वांना भेटून शुभेच्छा दिल्या. विनय लाटकर या उद्योगपतीच्या परिवारासह मित्रांनी जमा केलेली वार्षिक भिशी कोणतेही फोटोसेशन न करता या वृद्धाश्रमाला भेट दिली. आश्रमातील सर्वांची आपुलकीने विचारपूस करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या उद्योगपतींकडून दरवर्षी भिशी जमा केली जाते आणि दिवाळीदिवशी ती गरजूंना दिली जाते. या परिवारानेही आज मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
कोल्हापुरात आज अनेक विधायक उपक्रम होत आहेत. याचाच एक भाग असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन आज अनेकांनी आपली दिवाळी साजरी केली. परिवहन समितीचे सभापती लाला भोसले यांनी कार्यकर्त्यांसह येऊन फराळाचे वाटप केले. आश्रमातील वातावरण आनंदी राहावे, दिवाळीच्या वातावरणात वृद्धांचे मनोरंजन व्हावे म्हणून निरंकारी मिशनच्या सदस्यांनी सायंकाळी दोन तास भजन केले. उचगाव, पाचगाव, मोरेवाडी या परिसरातील सदस्यांनी भजन संध्या साजरी करून वृद्धांना आणखी आनंद देण्याचा प्रयत्न केला. शिवाजी पाटोळे, लीला पाटोळे, राजू मालवेकर, मनीषा मालवेकर, रोहन पाटोळे, राणी पाटोळे, नयना पाटोळे, शरद पाटोळे या कुटुंबीयांनी या वृद्धांना आज पुरीभाजीसह "स्वीट' जेवण देऊन आपुलकीचा गोडवा वाढविला. आश्रमात दिवसभर रक्ताच्या नात्यातील कोणी आले नाही म्हणून तेथील आजी-आजोबांची, आई-बाबांची दिवाळी साजरी व्हायची थांबली नाही. पण साजरी झाली ती मात्र इतरांच्या प्रेमाने आणि आपुलकीनेच.

एकही नातेवाईक फिरकला नाही...
मातोश्री वृद्धाश्रमात शंभर वृद्ध आहेत, ज्यांना वर्षभर कोणीही भेटायलासुद्धा येत नाही. किमान आज दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तरी कोणी येईल, अशी आमची अपेक्षा होती. काही जण मुलगा-मुलगी नाही, किमान नात-नातू येईल, या आशेवर होते; पण सूर्यास्त झाला तरीही कोणीही आश्रमाकडे फिरकले नाही आणि त्यांनी आज कोणीतरी रक्तातील भेटेल ही आशा सोडून दिल्याचे मातोश्री वृद्धाश्रमाचे ऍड. शरद पाटोळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com