सर्किट बेंचसाठी कोल्हापुरात वकिलांचे असहकार आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आजपासून वकिलांनी असहकार आंदोलन सुरू केले. पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्गमधील वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलन १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, न्यायालयातील कामकाज बंद राहिल्यामुळे कोल्हापुरातील साडेपाच ते सहा हजार खटल्याचे काम चालले नाही, असा दावा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. प्रशांत चिटणीस यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी ३४ वर्षे लढा सुरू आहे. दिरंगाई होत आहे, वेळोवेळी वकिलांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. म्हणून खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत आजपासून न्यायालयीन कामात असहकार धोरण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी न्याय संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ मंडप घालून वकिलांनी ‘वुई वॉन्ट सर्किट बेंच’ अशी घोषणाबाजी करीत कामकाजाला असहकार्य केले.

जिल्हा श्रमिक कामगार औद्योगिक संघ, कोल्हापूर आर्किटेक्‍ट व इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह कौटुंबीक न्यायालय, ग्राहक न्यायालय बार असोसिएशनने पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी अकरापासून सुरू झालेले आंदोलन सायंकाळपर्यंत सुरू होते. आज वकील आणि पक्षकार नसल्यामुळे कामकाज पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही, असा दावा वकिलांनी केला आहे.

आंदोलनात उपाध्यक्ष आनंदराव जाधव, माजी अध्यक्ष महादेवराव आडगुळे, अशोक पाटील, विवेक घाटगे, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, प्रकाश मोरे, माजी उपाध्यक्ष विजय चव्हाण, के. व्ही. पाटील, आर. बी. पाटील, राजेंद्र किंकर, नारायण भांदिगरे, विलासराव दळवी, सी. डी. मोरे, सुभाष पिसाळ, शामराव पाटील-शिरोळकर, ए. पी. पोवार, एस. जी. नाईक, प्रकाश हिलगे, सतीश खोतलांडे, एम. एल. अग्निहोत्री, अशोक उपाध्ये, के. व्ही. पाटील, मीना पवार, सविता परब, सुशीला कदम, वैशाली सवाखंडे, चारुलता चव्हाण, प्रमोदिनी शिंदे, गुरुदत्त पाटील, योगेश मांढरे, योगेश साळोखे, सागर पिसाळ, विजय पाटील, नारायण भांदिगरे, रणजित चेंडके, विजय मालेकर आदी वकिलांनी दिवसभर आंदोलनात सहभाग नोंदविला.

चेहरे रंगविले
‘खंडपीठ पाहिजेच’ असे चेहऱ्यावर रंगवून ग्राहक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रताप जाधव आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक वकिलांनी त्यांच्यासोबत उभा राहून सेल्फी घेतले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Non-Cooperation Movement of advocates for e Circuit Bench of Kolhapur