उत्तर भारतीयांची इचलकरंजी ते रामलिंग कावड यात्रा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

इचलकरंजी - हरहर महादेवाच्या जयघोषात इचलकरंजी येथे राहणाऱ्या उत्तर भारतीयांनी आज कावड यात्रा करीत रामलिंग क्षेत्राचे दर्शन घेतले. भर पावसात इचलकरंजी पंचगंगा नदी ते रामलिंग असा सुमारे 17 किलोमीटरचा प्रवास हजारो भाविकांनी पायी चालतच पूर्ण केला. यामध्ये महिला आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता. 

इचलकरंजी - हरहर महादेवाच्या जयघोषात इचलकरंजी येथे राहणाऱ्या उत्तर भारतीयांनी आज कावड यात्रा करीत रामलिंग क्षेत्राचे दर्शन घेतले. भर पावसात इचलकरंजी पंचगंगा नदी ते रामलिंग असा सुमारे 17 किलोमीटरचा प्रवास हजारो भाविकांनी पायी चालतच पूर्ण केला. यामध्ये महिला आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता. 

इचलकरंजी शहर व परिसरात उत्तर भारतीयांची संख्या मोठी आहे. आषाढीतील पौर्णिमेनंतर येणारा पहिला सोमवार हा उत्तर भारतीय श्रावण सोमवार म्हणून साजरा करतात. या दिवशी इचलकरंजी ते रामलिंग अशी कावड यात्रा काढण्यात येते. पहाटेपासूनच अनेक भाविक कावडमध्ये पाणी घेऊन त्याचा अभिषेक घालण्यासाठी रामलिंग या ठिकाणी जात असतात.

आज सकाळपासूनच इचलकरंजी ते हातकणंगले व रामलिंग या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी होती. सकाळपासूनच दमदार पाऊस या परिसरात होता; मात्र पावसाची तमा न बाळगता हरहर महादेवच्या घोषणा देत अनेकजण दर्शनासाठी जात होते. काही मंडळांनी संगीत वाद्याच्या तालात कावड यात्रा काढली होती.

घरातील अख्खे कुटुंब या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे मोठ्यांसह बालचमूही या कावड यात्रेत दिसत होते. पुरुषांबरोबरच अनेक महिलाही कावड घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. 

रामलिंग येथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मंदिराच्या चोहोभोवती नागरिकांची लागलेली रांग अल्लमप्रभूकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत होती. भर पावसातच अत्यंत शिस्तबद्धरित्या हे भाविक दर्शन घेत होते. रामलिंग परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची अनेक दुकाने गर्दीने भरून गेली होती. या मार्गावर अनेक रिक्षाचालकांनी आज वडाप वाहतूक करून भाविकांची सोय केली. हातकणंगले पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. 

खाद्य पदार्थांची सोय 
पदयात्रेतील भाविकांना चहा, नाष्टा, दूध ठिकठिकाणी मिळावे यासाठी कोरोची माळापासूनच अनेक मंडळांनी मोफत खाद्य पदार्थांचे वाटप सुरू केले होते. यामध्ये शाबू खिचडी, केळी, नारळाची बर्फी, मसाला दूध, चहा, पाणी यांचा समावेश होता. याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविक घेत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Indians Kawad Yatra from Ichalkaranji to Ramling