दहशत नव्हे, आधार वाटेल अशी कृती करू - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

इचलकरंजी - समाजात पोलिसांची दहशत नव्हे तर आधार वाटेल अशी कृती केली जाईल, असे स्पष्टीकरण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले. शहरातील बिघडलेल्या वाहतूक प्रश्‍नावर महत्त्वाचे बदल दिसतील, अशी ग्वाही देत इचलकरंजी परिसरातील गुंडगिरी मोडीत काढून अवैध धंदे बंद करणार असल्याचे सांगितले.

इचलकरंजी - समाजात पोलिसांची दहशत नव्हे तर आधार वाटेल अशी कृती केली जाईल, असे स्पष्टीकरण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले. शहरातील बिघडलेल्या वाहतूक प्रश्‍नावर महत्त्वाचे बदल दिसतील, अशी ग्वाही देत इचलकरंजी परिसरातील गुंडगिरी मोडीत काढून अवैध धंदे बंद करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील महेश सेवा समितीमध्ये पोलिस व जनता सुसंवाद कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी पोलिसांचे जीवन सुखकर होण्यासाठी सरकारने गृहबांधणीच्या योजनेतून इचलकरंजीतील पोलिसांसाठी 248 घरांचा प्रस्ताव मंजूर करून निधीदेखील वर्ग केल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालय परिसरांबरोबर बस स्थानकामध्ये मुली, महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या निर्भया पथकामुळे छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसल्याचे सांगितले.

पोलिस दलाने गुंडगिरी मोडीत काढण्याचा चंग बांधला असून आतापर्यंत परिक्षेत्रातील 26 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केल्याचे श्री. नांगरे -पाटील यांनी सांगितले. जे गुन्हेगार शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आले आहेत त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिघडत असेल तर त्यांच्या विरोधी हद्दपारीचे प्रस्ताव तयार केले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात प्रा. शेखर शहा, अभिजित पटवा, मुख्याध्यापिका दिवटे, रामचंद्र निमणकर, ऍड. दिलशाद मुजावर, शुभांगी शिंत्रे, ऍड. एम. वाय. सहस्रबुध्दे, ऍड. पवन उपाध्ये, अशोक बोरगावे, डॉ. आनंद कोळी, अभिजित सातपुते, संदीप राणे ( कबनूर ), सनतकुमार दायमा, नरेंद्र लाहोटी, दशरथ मोहिते आदींनी तक्रारी मांडल्या. तक्रारीचा दखल घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर त्याबाबतची आढावा बैठक तीन महिन्यांनंतर घेतली जाईल, असेही श्री. नांगरे - पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपाधिक्षक विनायक नरळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश पवार, गावभाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे, शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते.

निर्भया पथकाचे उल्लेखनीय काम
शहरातील निर्भया पथकाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरयू देशमुख यांनी टवाळखोर मुलांना समजुतीच्या गोष्टी सांगत सावरण्याचा सल्ला दिला. वेळप्रसंगी कारवाईचा बडगादेखील उगारला. त्यामुळे शहरात पथकाचे काम उल्लेखनीय असल्याने देशमुख यांना हजार रुपयाचे बक्षीस जाहीर करीत असल्याची घोषणा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केली.

Web Title: Not panic, that will be the basis to act