३५ कोटींची ड्रेनेजलाइन वापराविना

३५ कोटींची ड्रेनेजलाइन वापराविना

कोल्हापूर -  महापालिकेचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ याची प्रचीती येते. एकीकडे शहरातील अनेक भागांत ड्रेनेजलाइन नाही म्हणून ओरड होत असताना सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाइन मात्र ९ वर्षांपासून वापराविना पडूनच आहे. केंद्र सरकारच्या लहान व मध्यम शहराच्या विकासासाठी असलेल्या निधीतून ही ड्रेनेजलाइन टाकली; पण नागरिकांची उदासीनता, महापालिकेचे दुर्लक्ष यांमुळे या ड्रेनेजलाइनला ड्रेनेज जोडण्याच नसल्याने केवळ पावसाचे पाणी घेऊनच ही ड्रेनेजलाइन वाहते.

तर दुसरीकडे खुल्या गटारीतून, नाल्यातून मैला वाहत असल्याने शहराच्या दृष्टीने हे घातक बनले आहे; त्यामुळे महापालिकेने केलेले हे काम म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच आहे. केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेल्याचाच हा प्रकार आहे.

कोल्हापूर शहरात पूर्वीचे गावठाण सोडले, तर इतरत्र ड्रेनेजलाइन नसल्याने शहरातून होणारे प्रदूषण वाढले होते. या पार्श्‍वभूमीवर शहरातील एक मोठ्या विभागात मुख्य ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी केंद्र सरकारच्या लहान व मध्यम शहराच्या विकासासाठीच्या योजनेतून शहराला ३१ कोटींचा निधी मिळाला होता. अनेक वर्षांच्या मागणीनंतर शहरातील मुख्य गावठाण सोडून इतरत्र ड्रेनेजलाइन टाकण्याची कामे यामुळे मार्गी लागली. जरगनगर, हॉकी स्टेडियम, यल्लम्मा मंदिर चौक, गोखले कॉलेज, उमा टॉकीज ते टायटन शोरूम ते जयंती नाला अशी मोठी ड्रेनेजलाइन टाकली. त्याचबरोबर रंकाळा तलावाभोवतीही ड्रेनेजलाइन टाकली. सुमारे तीन ते चार वर्षे ही कामे सुरू होती. सुमारे तीन ते चार मीटर रस्ते खोदून अनेक भागांत ड्रेनेजलाइन टाकली. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यातला हा महत्त्वाचा टप्पा होता.

ही कामे पुर्ण होऊन आठ ते नऊ वर्षे झाली; पण वापराविना ही ड्रेनेजलाइन पडून आहे. ही ड्रेनेजलाइन टाकल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या शौचालयांचे कनेक्‍शन या ड्रेनेजलाइनला जोडणे  आवश्‍यक होते; पण तसे झालेले नाही. त्याचबरोबर व्यापारी संकुलासह अन्य कमर्शिअल इमारती, ऑफिसच्या जोडण्या या ड्रेनेजलाइनला जोडणे अपेक्षित होते; पण  ते झाले नसल्याने सेफ्टी टॅंकचाच वापर अजूनही सुरू आहे. त्यामुळे मैलायुक्त पाणी तसेच काही ठिकाणचा थेट मैलाच उघड्या गटारीत मिसळतो.

खर्चामुळे नागरिकांची उदासीनता
ड्रेनेज लाइनला शौचालयाचे कनेक्‍शन जोडण्यासाठी डिपॉझिट, तसेच रस्ते खोदाईचा खर्च म्हणून महापालिकेकडे पैसे भरावे लागतात. ही रक्कम ५ हजारांपासून ते १५ हजारांपर्यंत जाते. ही गोष्ट खर्चिक असल्याने अनेक नागरिकांनी ड्रेनेज लाइनला जोडण्या घेतल्या नाहीत. याबाबतीत लोकांचे प्रबोधन करून जोडण्या घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायला हवे. तसेच पैशात काही प्रमाणात सूट द्यायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com