उपअधीक्षकांसह चार जणांना  तीन लाखांच्या दंडाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

आयुक्त बिष्णोई यांनी पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे, लिपिक गणेश डोईफोडे यांना दोषी ठरवीत, 25 हजार रुपये दंड का आकारू नये, अशी नोटीस बजावली आहे.

नगर : पोलिस मुख्यालय (गृह) विभागाचे पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह चौघांना, माहिती अधिकाराच्या नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिष्णोई यांनी तीन लाख रुपये संयुक्त दंडाची नोटीस बजावली. पोलिस खात्यातील बडतर्फ कर्मचारी संजीव भास्कर पाटोळे यांच्या माहिती अधिकारातील अपिलात ही कारवाई करण्यात आली आहे.

संजीव पाटोळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू होती. या चौकशीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी अहवाल, कार्यालयीन टिप्पणी, चौकशी लिपिकाचे पद, नाव आदींची माहिती मिळविण्यासाठी पाटोळे यांनी पोलिस मुख्यालय (गृह) यांच्याकडे 26 नोव्हेंबर 2017 रोजी अर्ज केला होता. मात्र, मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे 10 जानेवारी 2018 रोजी अपील केले. त्या वेळी, सात दिवसांत पाटोळे यांना माहिती देण्याचा आदेश अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दिला. मात्र, त्यानंतरही माहिती न मिळाल्याने पाटोळे यांनी राज्य माहिती आयुक्तांकडे दुसरे अपील केले. 

राज्य आयुक्तांकडे द्वितीय अपील

आयुक्त बिष्णोई यांनी पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे, लिपिक गणेश डोईफोडे यांना दोषी ठरवीत, 25 हजार रुपये दंड का आकारू नये, अशी नोटीस बजावली आहे. पाटोळे यांनी विभागीय चौकशी रद्द होण्यासाठी 24 नोव्हेंबर 2017 रोजी अर्ज केला होता. त्याच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीची माहिती मागविली होती. ही माहिती वेळेत न मिळाल्याने, राज्य आयुक्तांकडे द्वितीय अपील दाखल केले. त्यात मुख्यालय उपअधीक्षक, अशोक परदेशी, गणेश डोईफोडे यांना दोषी धरून दंडाची नोटीस बजावली आहे. 

उपअधीक्षकांना सहा प्रकरणांत लिपिकांसह संयुक्त दंडाची नोटीस

पाटोळे यांच्या माहिती अधिकारातील 12 प्रकरणांत विभागीय आयुक्तांनी प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस उपअधीक्षकांना सहा प्रकरणांत लिपिकांसह संयुक्त दंडाची नोटीस काढली आहे. पोलिस मुख्यालयातील लिपिक गणेश डोईफोडे यांना नऊ प्रकरणांत, तत्कालीन कार्यालय अधीक्षक अशोक परदेशी यांना सहा, तर लिपिक चन्ना यांना दोन प्रकरणांमध्ये संयुक्त दंडासाठी दोषी धरून नोटिसा काढल्या आहेत. माहिती अधिकाराच्या अपिलात अर्जदार पाटोळे यांनी स्वतः काम पाहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice of fine to four police