पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटणाऱ्या रेशन दुकानदारांना नोटीस

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

दोन महिन्यांत जिल्ह्यातील ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे, अशा दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. परवाना निलंबित का करू नये? याची विचारणा या नोटीसद्वारे केली असून कमी धान्य वाटपाचा खुलासा दुकानदारांना करावा लागणार आहे.

सोलापूर : दोन महिन्यांत जिल्ह्यातील ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे, अशा दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली आहे. परवाना निलंबित का करू नये? याची विचारणा या नोटीसद्वारे केली असून कमी धान्य वाटपाचा खुलासा दुकानदारांना करावा लागणार आहे.

जिल्ह्यातील 55 रेशन दुकानांनी गेल्या दोन महिन्यांत 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वाटप केले आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील 17, बार्शीतील 13, माळशिरस व माढ्यातील प्रत्येकी सहा, मंगळवेढ्यातील पाच, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार, करमाळ्यातील दोन, मोहोळ व पंढरपूर तालुक्‍यातील प्रत्येकी एका दुकानाचा समावेश आहे. अन्न नागरी, पुरवठा मंत्रालयाच्या वतीने स्वस्त धान्य वितरण प्रणालीत कमालीची पारदर्शकता आणण्यात आली आहे. जानेवारीपासून स्वस्त धान्य वितरणाची सर्वच यंत्रणा 100 टक्के ऑनलाइन होणार आहे.

सध्या 50 टक्के वाटप हा निकष लावण्यात आला आहे. त्या पुढील महिन्यात 60 व 70 टक्के वाटपाचा निकष लावून त्यांनाही नोटीस दिली जाणार आहे. धान्य कमी वाटप झाले यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. - स्वप्नील रावडे, सहायक पुरवठा अधिकारी 

चहा पावडर सक्तीची नाही 
जिल्ह्यातील काही रेशन दुकानांमध्ये साखरेसोबत चहा पावडर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना इच्छा व गरज नसतानाही स्वस्तातल्या साखरेसाठी महाग असलेली चहा पावडर खरेदी करावी लागत आहे. स्वस्त धान्य दुकानात चहा पावडर विकण्याची परवानगी दिलेली नाही. शासनाने ज्या वस्तूंची परवानगी दिली आहे त्याच वस्तूंची विक्री आवश्‍यक आहे. कोणतीही वस्तू घेणे बंधनकारक नाही. ज्यांना वस्तू घेण्याचे बंधनकारक केले जाते त्यांनी पुरवठा शाखेत संबंधित दुकानदाराबाबत तक्रार करावी. पुरवठा विभागाच्या वतीने पडताळणी करून दोषी दुकानदारांवर कारवाई केली जाईल. अशी माहितीही सहायक पुरवठा अधिकारी स्वप्नील रावडे यांनी दिली.

Web Title: Notice to ration shoppers who have less than 50 percent of Grain allocation