सायकल थांबली, आता स्कूटीचे आमिष! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने सायकल वाटपाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन डाटा जमविल्यानंतर आता मोफत स्कूटी देण्यात येणार असल्याचे मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहेत. भारत सरकार डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे. तक्रार आल्याशिवाय काहीच करता येणार नाही अशी भूमिका सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. 

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने सायकल वाटपाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन डाटा जमविल्यानंतर आता मोफत स्कूटी देण्यात येणार असल्याचे मेसेज सगळीकडे व्हायरल होत आहेत. भारत सरकार डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे. तक्रार आल्याशिवाय काहीच करता येणार नाही अशी भूमिका सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव आणि छायाचित्र वापरून मोफत सायकल देण्याचे आमिष दाखविण्यात आले. भारत सरकार डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आले. सकाळने या संदर्भात बातमी प्रसिद्धी केली. ई सकाळच्या माध्यमातून हा विषय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यालयापर्यंत पोचविण्यात आला. त्यानंतर मोफत सायकल वाटपासाठी हॅकर मंडळींनी दिलेले संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. त्यानंतर स्कूटी वाटपाचे नावाने नवीन लिंक व्हायरल करण्यात येत आहे. 

लिंक ओपन केल्यानंतर पूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, पूर्ण पत्ता आणि राज्य या संदर्भातील माहिती देण्यात येत आहे. त्यानंतर दुसरे पेज ओपन होते. हा मेसेज दहा जणांना पाठविल्यानंतरच तुमची नोंदणी पूर्ण होईल असे सांगण्यात येते. सायकल, स्कूटी फुकटात मिळेल या आशाने अनेकजण हा मेसेज फॉरवर्ड करत आहेत. लिंकच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती संकलित केली जात असून यातून ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्‍यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही लिंक कोणीही ओपन करू नये, त्यावर माहिती भरू नये आणि महत्त्वाचे म्हणजे फॉरवर्ड करू नये असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मधुरा भास्कर यांनी केले आहे. 

दरम्यान, या संदर्भात तक्रार आल्याशिवाय काहीच करता येणार नाही अशी भूमिका सायबर पोलिसांनी घेतली आहे. सायकल, स्कूटीेच आमिष दाखवून ऑनलाइन माध्यमातून खुलेआमपणे लोकांचा डाटा जमविला जात असतानाही सायबर पोलिस शांत का आहेत असा सवाल नेटीझन्समधून विचारला जात आहे. 

भारत सरकार डॉट कॉम या संकेतस्थळावरून सायकल मोफत देण्याचे आमिष दाखविल्याने मी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदविली होती. ते संकेतस्थळ बंद करून आता भारत सरकार डॉट इन यावरून डाटा संकलित केला जात आहे. सायबर पोलिसांनी याकडे लक्ष देवून कारवाई करायला हवी. 
- शाम येमुल, संगणक तज्ञ

Web Title: now cycle scheme is stop and scooty scheme came