#HeritageConservation रायगडावरील पाणीसाठ्यांचा आता होणार दस्तऐवज

#HeritageConservation रायगडावरील पाणीसाठ्यांचा आता होणार दस्तऐवज

कोल्हापूर - रायगडासारखा अभेद्य किल्ला आजही शिवरायांच्या इतिहासाची जिवंत साक्ष आहे. किल्ल्यावरील प्रत्येक वास्तूत तर इतिहास दडलेलाच आहे; पण शिवरायांच्या शौर्याबरोबरच व्यवस्थापनाचे त्यांचे अन्य जे पैलू आहेत, त्यापैकी रायगडावरील जलव्यवस्थापनाचे तंत्र व त्याचे अस्तित्व नव्या पिढीसमोर आणण्यासाठी दस्ताऐवज (डॉक्‍युमेंटेशन) करण्याचे काम रायगड विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे.

पावसाळ्यात रायगडावर किती पाऊस पडला, त्याच्या नोंदी दाखवणाऱ्या दगडी पर्जन्यमापकाबरोबरच गडाच्या वेगवेगळ्या स्तरावरील (लेव्हल) पावसाचे पाणी दगडी पाटाने ८४ टाक्‍यांत कसे भरले जात होते व पुढे वर्षभर त्याच्या वापराचे कसे नियोजन होत होते, अशा स्वरूपाचा हा दस्तऐवज शिवरायांच्या वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणार आहे. 

‘रिडिस्कव्हरी ऑफ कॅपिटल कॉम्प्लेक्‍स रायगड’ अशा नावाने रायगडाच्या जतन व संवर्धनाचे काम चालू आहे. त्यानिमित्ताने हे वेगवेगळे पैलू पुढे येत आहेत. पाणी व्यवस्थापनाबरोबरच गडावरील ३५० वाड्यांपैकी एका वाड्याचे उत्खनन करताना खिळ्या-मोळ्यापासून सुवर्ण व चांदी अलंकार व अन्य ८५० छोट्या-मोठ्या वस्तू मिळाल्या आहेत. एका भग्न वाड्याचा तर अख्खा आधारवडच प्रकाशात आला आहे. हा सारा वारसा प्रयत्नपूर्वक जपला जाणार आहे.

या संदर्भात वास्तू संरक्षक वरुण भामरे यांनी सांगितले, की रायगडावर प्राधिकरणामार्फत जतन व संवर्धनाचे काम चालू आहे. पुरातत्त्व खात्याचे माजी संचालक डॉ. ए. के. सिन्हा, आर्किटेक्‍ट रामानाथन यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नातून हे काम चालू आहे. हे काम करताना शिवरायांच्या कार्याचा रोज एक नवा पैलू समोर येत आहे. त्यांच्या शौर्याचा इतिहास तर सर्व जगामध्ये नोंद झाला आहे; पण राज्य चालवायचे व्यवस्थापन रायगडाच्या बांधणीनिमित्त आजही आपल्यासमोर आहे. काळाच्या ओघात ते दडले आहे; पण जतन, संवर्धनानिमित्त ते पुन्हा प्रकाशात येत आहे आणि इतिहासाचा जसा वारसा आहे, तसा त्यांच्या जलव्यवस्थापनाचा वारसाही मोठा आहे. 

भामरे म्हणाले, ‘‘साधारण १२०० एकरांच्या या गडावर ८४ पाण्याच्या टाक्‍या आहेत. त्यात ११ मोठी तळी आहेत. त्यात पावसाळ्यात पाणी साठते; पण पाणी साठवण्यासाठी जे तंत्र वापरले आहे, ते म्हणजे किल्ल्यावरून येणारे पावसाचे पाणी दगडी पाटाद्वारे छोट्या हौदात घेतले आहे. हा हौद भरला की ते पाणी पुढच्या हौदात व त्यानंतर शेवटी कुशावर्त तलावात साठेल, अशी व्यवस्था आहे. आता आपण ज्याला रेन हॉर्वेस्टिंग म्हणतो तशाच स्वरूपाचे ३५० वर्षांपूर्वी शिवरायांनी प्रत्यक्ष वापरलेले हे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र आहे. विशेष हे की दगडी पर्जन्यमापक आहे. त्यात तीन छिद्रांतून पावसाचे पाणी पडते व पावसाची पातळी त्यातील रेखावरून कळते. ही सारी माहिती आजच उजेडात आली, असे नाही; पण या जलव्यवस्थापन तंत्राचे डॉक्‍युमेंटेशन आता करण्यात येत आहे. ते पर्यटक, गड अभ्यासक, संशोधक व विद्यार्थ्यांना खूप वेगळी माहिती देऊ शकेल. 

तांब्याचे नळ
जतन संवर्धनानिमित्त उत्खनन करत असताना तांब्याचे नळही मिळाले आहेत. तांब्याचे हे नळ त्याकाळी कशासाठी घातले होते, त्याचा वापर किंवा उपयोग कसा होत होता, हा अभ्यासाचा विषय आहे.

केवळ जलव्यवस्थापन नव्हे तर सांडपाण्याचे व्यवस्थापनही शिवकाळात कसे होते, हे रायगडावर सुरू असलेल्या कामातून दिसत आहे. राणीवसा, अष्टप्रधानांचे वाडे या ठिकाणी वाड्याला जोडूनच स्वच्छता व स्नानगृहे होती, हे स्पष्ट दिसते. त्यावर आणखी अभ्यास चालू आहे. 
- वरुण भामरे,
वास्तुसंरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com