
अलीकडच्या कालखंडात पूर्वीच्या साध्या चण्यांना बाजूला करत महाबळेश्वरी चणे विविध फ्लेवर, आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध हाेत असल्यामुळे चण्यांचा लौकिक वाढतोय.
पाचगणी : पोषक वातावरण, विविध फ्लेवर अन् आकर्षक पॅकिंग अशी सांगड मिळाल्याने महाबळेश्वर- पाचगणीच्या टपोरेदार "महाबळेश्वरी चण्याने' या परिसरात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, आता या चण्यांनी सातासमुद्रापलीकडे आपला लौकिक पोचवला आहे.
महाबळेश्वर व पाचगणी ही जगाच्या नकाशावर थंड हवेची ठिकाणे म्हणून विराजमान झाली असली, तरी "स्ट्रॉबेरीकंट्री' म्हणून या परिसराचे एक वेगळे वलय असून, मध, जॅम, जेली आणि तत्सम पदार्थांकरिताही अग्रगण्य आहे. नक्षीदार काट्याकरिता महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. आता येथील चण्याच्या व्यवसायाने आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे.
"महाबळेश्वरी चण्याचे' वैशिष्ट्य उलघडताना येथील राजेश चण्याचे उत्पादक दिनेश चौरसिया म्हणाले, ""पूर्वी कच्च्या चण्यांच्या खरेदी करिता सातारा, घोडनदी, शिरूर व सभोवतालच्या गावातून भ्रमंती करावी लागत असे. मात्र, सध्या पुणे बाजारपेठेत चण्यांची उपलब्धता होते.''
पूर्वीच्या जुन्या जातींऐवजी "मोसंबी' आणि "जम्बोश्री' या जातीच्या कच्च्या चण्यांचा वापरही केला जात असल्याची माहिती देताना कमलेश चौरसिया म्हणाले, ""अन्य ठिकाणांप्रमाणे महाबळेश्वरी चणे विशिष्ट तापमानात गरम करून पुन्हा थंड केले जातात. मात्र, येथील थंड हवेचीची जणू जादुई किमया आहे. शीतल वातावरण चणे फुलण्यासाठी पोषक असल्यामुळे ते अधिक टपोरेदार होतात व ही तर येथील चण्यांची खासियत होय !''
अलीकडच्या कालखंडात पूर्वीच्या साध्या चण्यांना बाजूला करत महाबळेश्वरी चणे आता चीज, टोमॅटो, पेरी पेरी, गार्लिक, पिझा, चाट, हिंग, ग्रीन चिली, मसाला व लेमन अशा 11 फ्लेवरचे साम्राज्य येथे प्रस्थापित झाल्यामुळे पर्यटकांना एक न्यारी मेजवानी मिळत आहे. त्याला नव्याने आकर्षक फूड्स पॅकिंगची अजोड किनार मिळाल्याने चना व्यवसायाने गरुडझेप घेतली आहे.
देशाच्या विविध भागांतून दाखल होणाऱ्या पर्यटकांबरोबरच पालक अथवा पर्यटक म्हणून दाखल होणारे परदेशी पाहुणे न विसरता येथील चण्यांना सातासमुद्रा पलीकडे घेऊन जातात, तसेच औषधी गुणधर्म असल्यानेही चण्यांना वाढती मागणी आहे.