सहकार मंत्र्यांसमोर जावयाचे आव्हान 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 11 मे 2018

सोलापूर : महापालिकेतील "लोकमंगल'चा लोकप्रिय प्रतिनिधी कोण, तर देशमुख हे एकच नाव सर्वांच्या ओठी असायचे. मात्र, काळ बदलला तसे ध्येयही बदलले आणि एकेकाळी देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले नरेंद्र काळे यांनी आज सहकारमंत्री देशमुख यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. देशमुख यांच्या लोकमंगल समूहाने आयोजिलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात काळेंचा विवाह झाला. त्यामुळे देशमुख काळे यांचा उल्लेख आमचा जावई असा करतात. त्यामुळे आता जावयानेच सासऱ्यासमोर आव्हान उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. 

काळे यांना 2012च्या महापालिका निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी देशमुख यांनी घेतली आणि निवडूनही आणले. नरेंद्र काळे हे भाजपचे नव्हे तर "लोकमंगल'चे उमेदवार असा प्रचार त्या वेळी करण्यात आला होता. काळे निवडूनही आले. अभ्यासू नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी महापालिकेतील अनेक गैरप्रकाराला आळा घातला. मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामातील गैरव्यवहार त्यांनी उघडकीस आणला. हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले. ते तडीस लावण्यासाठी काळे यांनी सहकारमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे काळे यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. 

दरम्यान, अभ्यासू वर्तनाने काळे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या नजरेत भरले आणि पालकमंत्र्यांनी काळे यांना थेट विरोधी पक्षनेत्याची संधी दिली. याच कारणामुळे देशमुख आणि काळे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. ते इतके टोकाला गेले की, महापालिकेच्या 2017 मध्ये काळे यांना पक्षाने निश्‍चित केलेले तिकीट कापण्याची सहकारमंत्र्यांची खेळी यशस्वी झाली. या कारणामुळे या दोघांमधील वितुष्ट आणखी वाढले. दक्षिण तालुक्‍यात ज्या कार्यक्रमाला काळे जात आहेत, त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख भावी आमदार असा केला जात आहे. काळे यांचा वाढदिवस नुकताच झाला. त्या वेळी नेटिझन्सनी दिलेल्या शुभेच्छा पाहता भविष्यात एक पर्यायी नेतृत्व त्यांच्या रूपाने पहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे.

लक्षात राहणारा मी एकमेव जावई 
लोकमंगल समूहाच्या माध्यमातून अनेक सामुदायिक विवाह सोहळे झाले. त्यात हजारो जोडप्यांचे विवाह झाले. पण, त्या सर्वांमध्ये बापूंच्या (देशमुख) लक्षात राहणारा मी "एकमेव' जावई आहे, असा उल्लेख काळे आवर्जून करतात. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणावर मात करतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

Web Title: now narendra kale Challenges minister deshmukh