आता उदयनराजेंकडे 'ही' नवी जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

उदयनराजे यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते निश्चित स्वीकारतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कोरेगाव (जि. सातारा) : जरंडेश्वर कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मदत करावी, त्यासाठीची जबाबदारी उदयनराजे यांच्यावर सोपवत असून, ते ही जबाबदारी स्वीकारतील, अशी अपेक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली.

राज्य सहकारी बॅंकेतील कथित घोटाळा बाहेर काढणारे, त्यासाठी न्यायालयामध्ये दीर्घकाळ लढा देणारे सहकारातील अभ्यासक व माजी आमदार माणिकराव जाधव आणि ऍड. सतीश तळेकर यांचा सत्कार येथे आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेत झाला. त्यावेळी श्रीमती पाटील बोलत होत्या.
 
त्या म्हणाल्या, ""जरंडेश्‍वर कारखाना परत मिळवून देण्यासाठी आतापर्यंत माणिकराव जाधव आणि ऍड. तळेकर यांचे मोठे सहकार्य झाले आहे. या दोघांच्या सहकार्याची यापुढेही आवश्‍यकता आहे. विशेषत: ऍड. तळेकर यांनी कायदेशीर बाबींसंदर्भात मदत करावी. केंद्रातील भाजपचे सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याची जबाबदारी उदयनराजे यांच्यावर सोपवण्यात येत आहे.'' ते ही जबाबदारी स्वीकारतील, असा विश्वासही श्रीमती पाटील यांनी व्यक्‍त केला.
 
शरद पवारांमुळे साखर कारखाने आजारी पडले

माणिकराव जाधव म्हणाले, "राज्यातील सहकारी चळवळीचा जगभर लौकिक होता; परंतु 1980 नंतर शरद पवार यांच्या धोरणामुळे अनेक साखर कारखाने आजारी पडले. राज्याची सुरू झालेली घसरण आजपर्यंत थांबली नाही. "जरंडेश्‍वर'चा समावेश पॅकेजमध्ये झाला असता, तर हा कारखाना कर्जमुक्त झाला असता आणि त्याच्या विक्रीची वेळच आली नसती.

निम्मे राजकीय नेते तुरुंगात जातील : ऍड. तळेकर

कारखाने आजारी पाडून ते राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून खरेदी करण्याचा सपाटाच लावण्यात आला होता. "जरंडेश्‍वर'चा खरेदीदार नेमका कोण? हेच पुढे येत नाही. त्यामुळे या कारखान्याची चोरी झाली आहे आणि आता तो लवकरच ईडी ताब्यात घेणार आहे. हा कारखाना सभासदांना मिळवून देण्यासाठी माझे सहकार्य राहील. "विक्री झालेल्या सर्व कारखान्यांची प्रमाणिक चौकशी झाल्यास राज्यातील निम्मे राजकीय नेते तुरुंगात जातील, असा दावा करून ऍड. तळेकर यांनी केला. 

"सभासदांच्या सहभागाशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही. त्यासाठी माझ्यासारख्याचा थोडासा हातभार लागला तर आणि सहकारी चळवळीला पुन्हा बळकटी आली तर माझ्या वकिली पेशाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.' असेही त्यांनी नमूद केले.

विविध ठरावांचे वाचन 
यावेळी नामदेव शिंदे यांचेही भाषण झाले. कारखाना परत मिळवण्याच्या अनुषंगाने यावेळी झालेल्या विविध ठरावांचे वाचन विजय चव्हाण, दत्तात्रय धुमाळ, विश्वासराव चव्हाण यांनी केले. नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले. पोपटराव जगदाळे यांनी आभार मानले.

यावेळी शंकरराव भोसले, उषाताई फाळके, प्रकाशराव फाळके, पोपटराव निकम, किसन घाडगे तसेच तेरणा, जालना, जिजामाता, पारनेर, आंबेजोगाई आदी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

"कोर्ट मॅटर' असतानाही कर्ज ? 

"जरंडेश्वर कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आमच्या प्रॉपर्टीवर 300 कोटींचे कर्ज विविध बॅंकांकडून काढले आहे. त्यात सातारा, पुणे, सिंधुदुर्ग या तीन प्रमुख जिल्हा बॅंकांच्या 125 कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. संबंधित बॅंकांना नोटीसवजा पत्र देऊन कर्जासंबंधी विचारणा करणार आहे.' 
- डॉ. शालिनीताई पाटील.

कोरेगाव : शेतकरी परिषदेत बोलताना डॉ. शालिनीताई पाटील. व्यासपीठावर माणिकराव जाधव, ऍड. सतीश तळेकर आदी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now This New Responsibility To Udayanraje