अपघानंतरची सेवा मिळणार आता एका क्‍लिकवर 

तात्या लांडगे
रविवार, 15 जुलै 2018

घरातील कर्ता पुरुष अपघातात अचानकपणे मृत्यू पावल्यास कुटुंबाची वाताहात होते. तसे प्रकार होऊ नयेत, या उद्देशानेच हे अॅप तयार केल्याचेही त्याने सांगितले.

सोलापूर : लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालविण्याने सोलापूर शहर-जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये अपघातानंतर तत्काळ सेवा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. आता त्यावर उपाय म्हणून सिंहगड अभियांत्रिकी कॉलेजमध्ये कॉम्प्युटर शाखेत बीईच्या तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चंद्रशेखर महादेव वरकले व सोहम नेसरीकर, श्रीकर वैतला या विद्यार्थ्यांनी एक स्वतंत्र अॅप तयार केले आहे.

प्राचार्य शंकर नवले, प्राचार्य सारंग तारे व रितेश धायमा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे 'एमर्जन्सी सर्विस' (Emergncy service) अॅप तयार केले आहे. त्याद्वारे आता रुग्णांना अपघातानंतरची सेवा काही वेळातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 

सद्यस्थितीत फक्‍त शहर हद्दीपुरतीच माहिती या अॅप मध्ये आहे. अॅपच्या माध्यमातून अपघातानंतर जवळच्या हॉस्पिटल, अॅम्ब्यूलन्स्‌, ब्लड बॅंक, पोलिस स्थानक, क्रेन, महामार्ग पोलिस यांचे क्रमांक उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अपघातग्रस्तांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल आणि त्यातून संबंधित रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होईल, असा विश्‍वास चंद्रशेखर वरकले याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला.

घरातील कर्ता पुरुष अपघातात अचानकपणे मृत्यू पावल्यास कुटुंबाची वाताहात होते. तसे प्रकार होऊ नयेत, या उद्देशानेच हे अॅप तयार केल्याचेही त्याने सांगितले. पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे, 'सकाळ'चे सहायोगी संपादक अभय दिवाणजी, सहायक पोलिस आयुक्‍त वैशाली शिंदे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

अॅप मधील ठळक बाबी... 

Web Title: Now with one click you will get the service after the accident by mobile application