सिव्हिलमध्ये आता सांडपाण्यावर प्रक्रिया

सिव्हिलमध्ये आता सांडपाण्यावर प्रक्रिया

सातारा - जिल्हा रुग्णालयातील दुर्गंधी व अस्वच्छेतला सर्वाधिक कारणीभूत असलेली ‘ड्रेनेज सिस्टीम’ बदलण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून ड्रेनेज सिस्टीम बदलण्याबरोबरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही उभारण्यात येणार असल्याने जिल्हा रुग्णालयातील सध्याचे वातावरण बदलण्यास मदत होणार आहे.

जिल्हा रुग्णालयाची सध्याची इमारत १९६५ मध्ये बांधण्यात आली आहे. ही इमारत सध्या तब्बल ५४ वर्षांची झाली आहे. त्यामुळे या इमारतीची ड्रेनेज सिस्टिम बहुतांश खराब झाली आहे. ठिकठिकाणचे चेंबर तुंबलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याने जिल्हा रुग्णालयात ठिकठिकाणी सांडपाण्याची गळती होत असते. अनेक ठिकाणी मैला वाहतुकीचे चेंबरनाही अडथळे आहेत. त्यातूनही पाणी व मैला वाहत असतो. अनेकदा यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. परंतु, एका ठिकाणी काम केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. या गळतीमुळे जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. 

जिल्हा रुग्णालयामध्ये विविध व्याधींचे रुग्ण उपचारासाठी दाखल असतात. त्याचबरोबर बाह्यरुग्ण विभागात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे रुग्णांना त्रास होतो. त्याचबरोबर आजार लवकर बरा होण्यातही अडचणी येतात. किंबहुना काही रुग्णांना दुसरे आजार होण्याची शक्‍यताही नाकारता येत नव्हती.

अनेक ठिकाणचे चेंबर तुंबलेले असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील शौचालये व अंघोळीच्या ठिकाणी पाणी साठण्याचे  प्रकार अनेक वॉर्डमध्ये घडत असतात. त्यातूनच वाट काढत रुग्णांना जावे लागत असल्याची परिस्थिती अनेकदा उद्‌भवते. त्यामुळे दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना काही वेळा किळसवाण्या गोष्टींना सामोरे जावे लागते.

जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. अमोद गडीकर यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली होती. त्यामुळे त्यांनी ड्रेनेज सिस्टिम बदलण्याबाबत पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले आहे. सुमारे ४० लाख रुपये जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज सिस्टिम व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध झाले आहेत. त्यात सांडपाण्याची सिस्टिम बदलणे, ब्लॉकेज काढणे, चेंबर बदलणे आदी कामे होणार आहेत. याबाबतचे टेंडर पुढील महिन्यात निघणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com