आता... नगरमधील शोरूमच निशाण्यावर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

शहरातील सावेडी उपनगरातील नगर- मनमाड रस्त्यावरील शो-रूम, टायर, सायकल दुकानासह पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. दोन दुकानांत घुसून सुमारे चाळीस हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

नगर : शहरातील सावेडी उपनगरातील नगर- मनमाड रस्त्यावरील शो-रूम, टायर, सायकल दुकानासह पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. दोन दुकानांत घुसून सुमारे चाळीस हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

नगर शहरामध्ये दुचाकींची चोरी आणि घरफोडीच्या घटना आता सर्रास झाल्या आहेत. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. मात्र, तरीही चोर संधी साधत आहेत.

शहरातून नगर-मनमाड रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर नगर शहरापासून बोल्हेगाव एमआयडीसीपर्यंत व्यावसायिकांची दुकाने आहेत. मंगळवारी रात्री चोरांनी अक्षर: धुडगूस घालत सावेडी नाका परिसरातील मराठा सायकल मार्ट, एमआरएफ टायर आणि बॅटरीचे शो-रूम अशा तिन्ही दुकानांची शटर कटावणीच्या साह्याने उचकटली.

आत प्रवेश करून साहित्याची उचकापाचक केली. मराठा मंदिर सायकल मार्टमधून चोरांनी तीन हजार 800 रुपये लांबविले. बॅटरीच्या दुकानातून चाळीस हजार रुपये लांबविले. सर्वच दुकाने एकाच पद्धतीने फोडली गेल्याने, हे कृत्य एकाच टोळीचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. अन्य दोन दुकाने फोडण्याचाही प्रयत्न चोरांनी केला. 

दरम्यान, आज सकाळी दुकाने फोडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हारून मुलाणी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तपासासाठी पथके रवाना केली. 

दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत तोफखाना पोलिसांकडे माहिती घेतली असता, अद्यापपर्यंत फिर्याद देण्यासाठी कोणीही आले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

चोर सीसीटीव्हीमध्ये कैद 

महामार्गावरील दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोर कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. 

पोलिसांची गस्त कोठे? 

दिवस-रात्र वर्दळ असलेल्या रस्त्यावरील दुकाने चोर फोडतात, मग पोलिस नेमके कोठे गस्त घालत असतात, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. पोलिसांची नियमित गस्त असल्यास भर रस्त्यावरील दुकाने फोडणे चोरांना अशक्‍य असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now ... the showrooms in town are on target!