''आता एसटीत उलटी आल्यावर करायचं काय ?''

परशुराम कोकणे
शनिवार, 23 जून 2018

कोणाचे काहीही म्हणणे असले तरी माझा प्लास्टिक बंदीला पूर्ण पाठिंबा आहे, अशी पोस्ट पर्यावरणप्रेमी सतीश मराठे यांनी शेअर केली आहे. आता सगळ्यांनी सोबत किंवा वाहनाच्या डिकीत कापशी पिशवी ठेऊन स्वत:ची आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळावी, असे व्यापारी ब्रिजेश कासाट यांनी म्हटले.

सोलापूर : नवीन काहीतरी वेगळे होत असेल तर सोशल मीडियावर चर्चा तर होणारच..! यात प्लास्टिक बंदीचा विषय मागे कसा राहील. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर प्लास्टिक बंदीवर चांगलीच चर्चा रंगली आहे. आता एसटीत उलटी आल्यावर काय करायचं?, प्लास्टिक पिशवी हातात दिसली तर नागरिकांना पाच हजार रुपये दंड हा निर्णय चांगला आहे, पण रस्त्यात खड्डे दिसले तर महापालिकेला व नगरसेवकाला किती दंड ? रेनकोट चालेल का? का तो पण कागदाचा घालायचा? अशा गमतीशीर पोस्टसोबतच प्लास्टिक बंदीला समर्थन करणाऱ्या पोस्टही शेअर केल्या जात आहेत. 

फेसबुक, व्हॉट्‌सअॅप यांसह इतरही सोशल मीडियावर प्लास्टिक बंदीवर चर्चा सुरू आहे. महापालिकेने शनिवार सकाळपासून कारवाईला सुरवात केली. त्यानंतर प्लास्टिक बंदीची पहिली विकेट म्हणून अनेकांनी दंडाच्या पावत्या व्हायरल केल्या. प्लास्टिक पिशवी हातात दिसली तर नागरिकांना पाच हजार रुपये दंड हा निर्णय चांगला आहे, पण रस्त्यात खड्डे दिसले तर महापालिकेला व नगरसेवकाला किती दंड? असा सवाल मनिषा नलावडे यांनी विचारला. राहुल सावळे यांनी एसटीमध्ये उलटी आल्यावर आता काय करायचे? असा गंमतशीर सवाल विचारला आहे.

कोणाचे काहीही म्हणणे असले तरी माझा प्लास्टिक बंदीला पूर्ण पाठिंबा आहे, अशी पोस्ट पर्यावरणप्रेमी सतीश मराठे यांनी शेअर केली आहे. आता सगळ्यांनी सोबत किंवा वाहनाच्या डिकीत कापशी पिशवी ठेऊन स्वत:ची आणि व्यापाऱ्यांची गैरसोय टाळावी, असे व्यापारी ब्रिजेश कासाट यांनी म्हटले. रेवण कोळी यांनी प्लास्टिक बंदीची पहिली कारवाई सोलापुरात झाल्याचे सांगत महापालिकेने केलेल्या दंडाची पावती शेअर केली आहे. 

सोशल मीडियावरील पोस्ट.. 

आता हे कशात आणायचे, ते कशात आणायचे असे विचारणाऱ्यांनी प्लास्टिक येण्यापूर्वीचे दिवस आठवावेत. कॅरिबॅग बंद म्हणजे बंद. 

- ऋषिकेश मैंदर्गीकर 

- प्लास्टिक बंदीमुळे नोकरशहांना चरायला आणखीन एक कुरण मिळाले आहे. प्लास्टिक हे पर्यावरणास हानीकारक नसून रिसायकलिंग होत नाही ही समस्या आहे. प्लास्टिक शंभर टक्के रिसायकलिंग करा, मग प्लास्टिक पर्यावरणपूरकच आहे. कुठल्याही परिस्थितीत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक तयार करू नये. 

- योगीन गुर्जर 

- प्लास्टिक पिशवी बंद करण्यापेक्षा दारूबंदी करा. 

- सूरज कदम 

- आजपासून प्लास्टिक बंदी आहे. रेनकोट घातला तर चालेल का? की तो पण कागदाचा बनवायचा? नाही तर रेनकोटवरच उचलून नेतील. 

- अक्षय गायकवाड 

- राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्लास्टिक बंदीचे समर्थन करूया आणि महाराष्ट्र वाचवूया. 

- दिलीप कलागते 

- सगळे प्लास्टिक बंद होईल, पण काळी पिशवी बंद होणार नाही. 

- राजेंद्र भोसले 

प्लास्टिक बंदीवर जोक चालू आहेत, ठीक आहे चालू द्या. काही पण नवीन नियम वगैरे आली की आपल्याला 2-4 दिवस सोशल मीडियासाठी मसाला भेटतो. प्लास्टिक यायच्या आधी पण मटण होतं बरं, मी स्वतः स्टीलचा डब्बा घरून घेऊन जायचो. सांगायचं तात्पर्य असे की काही चांगलं होत असेल तर त्याला पाठिंबा दिलाच पाहिजे. 

- गणेश तुपकर

Web Title: Now what to do when the vomit in the station