एनपीए वाढीला सरकारच जबाबदार ; राजन पाटील  

तात्या लांडगे
शनिवार, 28 एप्रिल 2018

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या जिल्हा बँकेच्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
सरकारने 24 जून 2017 रोजी कर्जमाफी जाहीर केली.

सोलापूर : जिल्हा बँकेच्या वाढलेल्या एनपीएला (अनुत्पादित कर्ज) सरकार जबाबदार असून त्यांच्याकडून कर्जमाफीला विलंब झाल्यानेच बँकेचा एनपीए यंदा वाढला असल्याचा थेट आरोप करत सोलापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला. 

जिल्हा बँकेचे शेती व बिगरशेतीचे सध्याचे अनुत्पादिक कर्ज 846 कोटी 71 लाख रुपये इतके आहे. त्यामध्ये शेतीकडे 325 कोटी 97 लाख रुपये तर बिगरशेतीकडील 538 कोटी 73 लाख 76 हजार रुपयांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अनुत्पादित कर्जामध्ये 11 कोटी 94 लाखांची भर पडली आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून कर्जमाफीला झालेला विलंब असल्याचे पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या जिल्हा बँकेच्या एकूण शेतकऱ्यांपैकी सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
सरकारने 24 जून 2017 रोजी कर्जमाफी जाहीर केली. आता दहा महिने झाले मात्र, ऑनलाइनच्या नादात राज्यातील कित्येक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या याद्यांमध्ये तांत्रिक घोळ कायम असून, सरकारच पारदर्शक नाही आणि शेतकऱ्यांना व बँकांना पारदर्शकता शिकवित असल्याचेही पाटील म्हणाले. 

कर्जमाफीच्या विलंब काळातील व्याज आणि नोटाबंदीनंतर बँकेकडे जमा झालेली रक्‍कम वेळेवर न स्वीकारल्याने त्या रकमेवरील व्याज, यामुळेच सहकारी बँका अडचणीत आल्या असून, त्याला जबाबदार सरकारच असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला आहे. दीड लाखांहून अधिक रक्‍कम असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेकडे पैसे जमा करूनही त्यांच्यासाठी सरकारकडून मागील दीड महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

आकडे बोलतात... 

एकूण अर्जदार शेतकरी 
2,20,990 

कर्जमाफी मिळालेले शेतकरी 
1,08,894 

मिळालेली रक्‍कम 
561.07 कोटी 

प्रतीक्षेतील शेतकरी 
1,12,096 

Web Title: NPA increases because of government says Rajan Patil