बायोमेट्रिक धान्य विक्रीत चंदगड जिल्ह्यात नंबर 1 

सुनील कोंडुसकर
शनिवार, 6 मे 2017

चंदगड - बायोमेट्रिक पद्धतीने स्वस्त धान्य विक्रीत चंदगड तालुक्‍याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्‍यातील तीस हजार शिधापत्रिकेवरील सुमारे दीड लाख लाभार्थी आधार कार्डशी लिंकिंग करण्यात आले असून सर्व 137 स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य विक्री सुरू आहे. 

चंदगड - बायोमेट्रिक पद्धतीने स्वस्त धान्य विक्रीत चंदगड तालुक्‍याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तालुक्‍यातील तीस हजार शिधापत्रिकेवरील सुमारे दीड लाख लाभार्थी आधार कार्डशी लिंकिंग करण्यात आले असून सर्व 137 स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य विक्री सुरू आहे. 

शासनाने कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे धोरण स्वीकारले आहे. स्वस्त धान्य दुकानात रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी अशाच प्रकारे पॉज मशीनचा वापर सुरू झाला आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात चंदगड तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात सर्वात प्रथम सर्व शिधापत्रिका आधार कार्डशी जोडून बायोमेट्रिक पद्धतीने दररोज सुमारे दीड हजार क्विंटल धान्य वितरित केले जात आहे. 

यासाठी स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदारांना शासनाकडून इलेक्‍ट्रॉनिक मशिन्स पुरवण्यात आल्या आहेत. त्या कशा हाताळायच्या याचे प्रशिक्षणही दिले आहे. मशीन सुरू झाले की लॉग ईन करावे लागते. त्यानंतर संबंधित दुकानाला पासवर्ड डायल केल्यावर मशीन प्रत्यक्ष कार्यरत होते. ग्राहकाच्या शिधापत्रिकेवरील बारा अंकी क्रमांक दाबल्यानंतर त्याला त्या महिन्यात मंजूर धान्याची यादी येते. त्यापैकी ग्राहक आपल्या गरजेनुसार धान्य घेऊ शकतो. शिल्लक धान्य त्याला त्या महिन्यातच उचल करावे लागते. मशीनवर अंगठा लावल्यानंतर तो त्या शिधापत्रिकेवरील लाभार्थ्याच्या अंगठ्याच्या ठशाशी जुळत असेल तरच बिलाची पावती निघते. यामुळे शिधापत्रिकाधारकाला नेमकेपणाने लाभ देता येतो. दुसरीकडे रेशन धान्यातील काळा बाजार रोखला जातो. यासाठी प्रभारी तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी सांगितले. यासाठी मंडल अधिकारी ए. बी. शेट्टी, गजानन मेघमाळे तसेच तांत्रिक विभागातील कर्मचारी अमित पेडणेकर यांनी कष्ट घेतले. 

तालुका दृष्टिक्षेपात 
एकूण शिधापत्रिका- सुमारे 30 हजार 
एकूण लाभार्थी- सुमारे दीड लाख 
एकूण स्वस्त धान्य दुकाने- 137 

Web Title: Number 1 in Chandgad district in the sale of biometric grains