माळरानांवरील पार्ट्या, आगीमुळे धोक्‍यात आलाय धाविक! 

परशुराम कोकणे
रविवार, 21 एप्रिल 2019

  • संवाद, प्रबोधनातून सुरू आहे संवर्धनासाठी पक्षीप्रेमींचे प्रयत्न 
  • माळरानावर दिसणाऱ्या सुंदर अशा धाविक पक्ष्यांची संख्या होतेय कमी
  • रिक्षा, कारमध्ये जोराने गाणी लावून गोंधळ घालण्याचेही प्रकार 

सोलापूर : शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाविक पक्ष्याचा अधिवास धोक्‍यात आला आहे. सोलापूर परिसरातील माळरानावर सातत्याने घडणाऱ्या आगीच्या घटना, दारू आणि मटणाच्या पार्ट्या थांबवून धाविक पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी सोलापुरातील पक्षीप्रेमी प्रयत्न करीत आहेत. 

माळरानावर दिसणाऱ्या सुंदर अशा धाविक पक्ष्याची संख्या कमी होत आहे. पूर्वी नान्नज, गंगेवाडी, कुंभारी परिसरातील माळरानावर धाविक मोठ्या संख्येने दिसायचे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या निरीक्षणात कुंभारी परिसरात 14 धाविक पक्ष्यांची नोंद झाली आहे. धाविक हा शेतकऱ्याचा मित्र आहे. ज्वारीवरील मुंग्या, किडे खाऊन तो धान्याचे रक्षण करतो. तो पूर्णपणे मांसाहारी आहे. माळरानावर वेगवेगळ्या कारणांमुळे आगीच्या घटना घडत आहेत. माळरानावरील प्लॉटिंग पद्धतीमुळेही धाविक पक्ष्याचा अधिवास नष्ट होत आहे. त्याच्या प्रजननावर परिणाम होत आहे. तसेच, सोलापूर परिसरात जिथे-जिथे माळरान आहे, मोकळी जागा आहे तिथे दारू आणि मटनाची पार्टी केली जात आहे. रिक्षा, कारमध्ये जोराने गाणी लावून गोंधळ घालण्याचे प्रकारही घडत आहेत. जेवण करून झाल्यानंतर खरकटे तिथेच टाकले जात आहे. असे प्रकार थांबविण्यासाठी पक्षीप्रेमी मंडळींचा जिथे जिथे माळरान आहे तेथील लोकांशी आणि पार्ट्या करणाऱ्या लोकांशी संवाद सुरू आहे. 
धाविक वेगाने धावतो, त्यामुळे नाव धाविक पडले आहे. मुंबई व अन्य जिल्ह्यांतील लोक धाविक पाहण्यासाठी येतात. धाविकच्या पायांची रचना इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी आहे. धाविकला समोरच्या बाजूला तीन बोटे आहेत. त्याला झाडावर बसता येत नाही. धाविक पक्ष्याच्या प्रजनन कालावधीवरून आपल्याला पावसाचा अंदाज बांधता येतो. अंडी दिल्यानंतर 25 दिवसांनंतर पक्षी बाहेर येतो. दीड महिन्यानंतर पक्षी उडण्यासाठी सज्ज होतो. हे सगळं पावसाच्या आधी होतं. हा पक्षी उंच उडू शकतो. धाविक पक्ष्याची अंडी सहजासहजी दिसत नाहीत. धाविक पक्ष्यासोबत माळटिटवी, पखुर्डी या पक्ष्यांची संख्याही कमी होत आहे. एक एकर परिसरात जवळपास 100 प्रकारचे जीव आढळतात, असे पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी सांगितले. 

bird

मानवी हस्तक्षेपामुळे माळरानावरील सुंदरता कमी होत आहे. माळरान संपुष्टात येत असल्याने धाविक पक्ष्याचा अधिवास धोक्‍यात आला आहे. हा पक्षी वेगाने धावतो म्हणून त्याचे नाव धाविक आहे. तो जमिनीवर अंडी घालतो. काळ्या मुंग्या, गवताच्या बिया, नाकतोडे, गवताच्या मुळाला असणारे किडे, ज्वारीसह अन्य पिकावरील किडे, मुंग्या हे त्याचे खाद्य आहे. 
- शिवानंद हिरेमठ, पक्षी अभ्यासक

Web Title: The number of Indian Courses a decreasing