जलसंधारणाने घटली टॅंकरची संख्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

उन्हाची तीव्रता वाढली असून, यावर्षी पारा सर्वाधिक 41.02 अंश सेल्सिअसवर गेला आहे. जलस्त्रोतही अटल्याने दुष्काळ माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यास पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, पाटण, जावळीतील काही गावांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात 33 टॅंकरना मंजुरी मिळाली असून, त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जलसंधारणाची झालेली कामे, गेल्या वर्षीचा सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे यंदा टॅंकरची संख्या घटली आहे. 

सातारा, ता. 7 : उन्हाची तीव्रता वाढली असून, यावर्षी पारा सर्वाधिक 41.02 अंश सेल्सिअसवर गेला आहे. जलस्त्रोतही अटल्याने दुष्काळ माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यास पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, पाटण, जावळीतील काही गावांत लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात 33 टॅंकरना मंजुरी मिळाली असून, त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जलसंधारणाची झालेली कामे, गेल्या वर्षीचा सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे यंदा टॅंकरची संख्या घटली आहे. 
जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता एकीकडे अतिपावसाचा महाबळेश्‍वर तालुका, तर दुसरीकडे अत्यंत कमी पर्जन्यमान असलेला माण, खटाव तालुका आहे. पश्‍चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण चांगले असले, तरी पूर्वेकडील तालुक्‍यांत कमी पाऊस असल्याने हा भाग दुष्काळी बनला आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात या भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मे महिन्यातील रखरखत्या उन्हाच्या झळा सर्वत्र बसत असून, दुष्काळ माण, खटाव, कोरेगाव तालुक्‍यांच्या उत्तर भागात त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. ठिकठिकाणचे जलस्त्रोत आटत चालले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने आजअखेर 33 टॅंकरना मंजुरी दिली असून, दोन दिवसांत हे टॅंकरही कार्यान्वित होतील. यंदा वळीव पावसाचे प्रमाण कमी असल्याने टॅंकरची मागणी वाढत आहे. 
जलयुक्‍त शिवार अभियानासह विविध सामाजिक उपक्रमांद्वारे काही वर्षांपासून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यात पाणीसाठा झाला असल्याने दुष्काळी भागातील अनेक गावांत अद्यापही टॅंकरची आवश्‍यकता भासली नाही. जलयुक्‍त शिवार अभियानातून कामे झालेल्या बहुतांश गावांमध्ये सध्या टॅंकर सुरू नाही. गेल्या वर्षी आजमितीला जिल्ह्यात 107 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. यंदा, मात्र टॅंकरचे प्रमाण कमी राहिले आहे. 

टॅंकर सुरू असलेली गावे 
विरळी, पुकळेवाडी, कुकुडवाड, पाचवड, वारुगड, महिमानगड, उकिर्डे, शिंदी बुद्रुक, मोगराळे, जाधववाडी (ता. माण), गारवडी, अनफळे, पाचवड (ता. खटाव), केळघर, दरे बुद्रुक, मुकवले (ता. जावळी), राजपुरी, तायघाट (ता. महाबळेश्‍वर), भोसगाव- अंब्रुळकरवाडी, फडतरवाडी- घोट (ता. पाटण), भंडारमाची, भाटमवाडी (ता. कोरेगाव) 

Web Title: Number of tankers reduced by water conservation