'सिव्हिल' मध्ये आता नर्सिंगचा पदवी ; नवीन अभ्यासक्रमास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

जिल्हा रुग्णालयातही पदवी अभ्यासक्रम सुरू होण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. 

सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचा पदवीचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाला सुरवात होऊ शकते. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच रुग्णांच्या तब्बेतीत सुधारणा होण्यासाठी एका चांगल्या परिचारिकेचाही मोठा वाटा असतो. रुग्ण सेवेबरोबरच जिल्हा रुग्णालयामध्ये नर्सिंग कॉलजेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदतीनस म्हणून काम करण्याची जबाबदारी असणाऱ्या परिचारिका घडविण्याचे काम केले जाते. या कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या परिचारिकांनाच शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा करण्याची संधी असते, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये या विद्यार्थ्यांना चांगली मागणी असते.

सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये परिचारिका प्रशिक्षणाचे दोन कोर्स सुरू आहेत. त्यात जनरल नर्सिंगचा तीन वर्षांच्या डिप्लोमाचा अभ्यासक्रम आहे, तसेच दोन वर्षांच्या आक्‍झिलरी नर्सिंगचा अभ्यासक्रम आहे. डिप्लोमाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींची परिचारिका म्हणून जिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवेची संधी उपलब्ध होत असते, तर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सहायक परिचारिका म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर नियुक्ती होत असते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये इंटरशिपही करावी लागते. 

सध्या या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमाऐवजी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेसाठी परिचारिका म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. रुग्णाला अधिक चांगल्या परिचारिका सेवा उपलब्ध व्हाव्यात, हा त्या मागचा उद्देश आहे. यापूर्वी पदवीचा अभ्याक्रम पूर्ण केलेल्यांना नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तही मिळत होती; परंतु आता त्यासाठी पदव्युत्तर शिक्षण ग्राह्य धरण्याचे विचाराधीन आहे. त्यामुळे डिप्लोमाचा कोर्स असलेल्या ठिकाणी पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nursing Degree in Civil hospital soon