पोषण आहार पुरवठा ठेकेदाराचा ठेका संपल्याने विद्यार्थ्यांची उपासमार

हुकूम मुलाणी 
शनिवार, 12 जानेवारी 2019

मंगळवेढा -  तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जनतेसह मुक्या जनावराची तीव्र परीक्षा घेत असताना या झळीतून शालेय विद्यार्थी सुध्दा सुटले नाहीत. पोषण आहार पुरवठा ठेकेदाराचा ठेका संपल्याने नवीन वर्षापासून शालेय पोषण आहारांतर्गत लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा देखील पुरवठादाराने केला नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची उपासमार होऊ लागली आहे. शिक्षण विभागाने पर्याय व्यवस्था करण्याच्या सुचना शिक्षकांना दिल्या असल्या तरी व्यवस्था करताना शिक्षकाना दमछाक होत आहे.

तालुक्यामध्ये तेरा केंद्रातून जवळपास 18 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, यात प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण शिकताना गरीब आणि श्रीमंत अशी दरी न राहता मध्यान्ह भोजनामध्ये सर्व विद्यार्थी एकसारखे जेवण मिळून खावे व सकस आहारातून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून शालेय पोषण आहाराचा पुरवठा शासनाने केला आहे. या साहित्यातून शाळेतून अन्न शिजवून देण्याची व्यवस्था केली असून यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली असून, तालुक्यातील विविध शाळांना लागणारे साहित्य पुरवले जाते. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून येथील साहित्य पुरवले नसल्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. अगोदर दुष्काळी परिस्थितीत जनावरे आणि शेतकरी बेजार झाले असताना पर्यायी व्यवस्था करताना शिक्षकही बेजार झाले.

यामुळे दुपारच्या भोजनामध्ये विद्यार्थ्यांना काय द्यायचे हा प्रश्‍न मुख्याध्यापक बरोबर शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांना लोकसहभागातून विद्यार्थ्यांना आहार द्यावा अशा सुचना असल्या तरी यासाठी लोकाचा सहभाग दुष्काळी परिस्थितीमुळे मिळत नाही. बदलत्या जमान्यात शिक्षण वेगवान होत असताना शिक्षकांना आणि मुख्याध्यापकाला शिक्षणापेक्षा आहाराची व्यवस्था करण्यातच अधिक वेळ जाऊ लागला आहे अगोदर प्राथमिक शिक्षकांना शिक्षणाशिवाय अन्य कामे जास्त असल्याची ओरड होत असताना यात नवीन भर पडल्याने मुख्याध्यापक व शिक्षकही बेजार झाले..

ठेका संपल्यामुळे विद्यार्थीची उपासमार होवू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या ठेकेदारास मुदतवाढ मिळाल्याचे वरिष्ठ स्तरावर सांगितले असून पुरवठा सुरू केला आहे.
- बजरंग पांढरे गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा

तालुक्यात वाडीवस्तीवरील शाळा जास्त असल्याने रस्ता न नसलेल्या ठिकाणी जावून पोहच करताना वेळ  जात असला तरीही वेळेत पोहच करण्याचे काम सुरू आहे.
- महादेव भालेराव , वाहतूक ठेकेदार

Web Title: Nutrition Supplements After the contractor's contract ended