आरक्षणानंतर सांगली जि. प. मध्ये अध्यक्षपदासाठी 'यांची' नावे चर्चेत

OBC Woman ZP Reservation In Sangli
OBC Woman ZP Reservation In Sangli

सांगली - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची लॉटरी आज मुंबईत मंत्रालयात फुटली. त्यात सांगली जिल्हा परिषदेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलासाठी आरक्षण जाहीर झाले. येथे भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षात मिळून आठ महिला ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. सध्या भाजपची सत्ता आहे, मात्र राज्यातील नव्या समीकरणांचा परिणाम झाला तर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला सत्ता स्थापनेची संधी आहे. त्यामुळे आठपैकी कोणाला अध्यक्षपदी संधी मिळणार, याची उत्सुकता आता लागली आहे. 

सांगली जिल्हा परिषदेत सध्या आरक्षण खुले होते. जिल्हा परिषदेवर ऐतिहासिक सत्ता मिळवल्यानंतर भाजपचे संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष झाले. 19 सप्टेंबरला अडीच वर्षाची त्यांची मुदत संपली, मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने राज्यातील जिल्हा परिषदांना राज्य शासनाने चार महिन्यांची मुदतवाढ दिली. नवे आरक्षण डिसेंबरमध्ये निघेल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतू राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ सुरु आहे. राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे आरक्षणाची सोडत प्रक्रिया गतीने राबवण्यात आली. आज आरक्षणाची लॉटरी जाहीर झाल्याने चार महिन्यांच्या आतच नवीन अध्यक्षनिवड होणार हेही जवळपास स्पष्ट झाले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागू शकतो. 

भाजपची काठावर सत्ता

दुसरीकडे राज्यातील नव्या सत्ता समीकरणांचा जिल्हा परिषदेच्या सत्तेवर थेट परिणाम संभवतो. सत्ता बदलू शकते. येथे भाजपची काठावर सत्ता आहे. शिवसेनेने टेकू काढून कॉंग्रेस, राष्ट्रवादीला साथ दिली तर राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळू शकते. तसे झाल्यास मांगले (ता. शिराळा) येथील अश्‍विनी नाईक या एकमेव दावेदार असतील. कॉंग्रेसला संधी मिळाली तर मुचंडी (ता. जत) येथील कलावती गौरगोंड आणि पणुंब्रे वारूण (ता. शिराळा) येथील शारदा पाटील यांच्या नावाची चर्चा होईल. 

नवे समीकरण होईल ? 
राज्यात महाशिवआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम लागला तर सांगली जिल्हा परिषदेत सत्ता बदलाची दाट शक्‍यता संभवते. त्याआधीही शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसची बोलणी झाली तरीही नवे चित्र समोर येऊ शकते. त्यात राष्ट्रवादीचे 14, कॉंग्रेसचे 8, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1 असे एकूण 23 सदस्य आहेत. 57 सदस्य संख्या असलेल्या सभागृहात 29 सदस्य घेऊन सत्ता स्थापन होईल. शिवसेनेच्या आमदार अनिल बाबर यांनी साथ दिली तर 3, शिवसेनेत असलेल्या घोरपडे गटाने साथ दिली तर 2 असे पाच सदस्य हक्काचे मिळतील. केवळ एक सदस्य आवश्‍यक असेल. या स्थिती शिवसेनेत प्रवेश केलेल्या गौरव नायकवडी यांच्या कुटुंबातून डॉ. सुषमा नायकवडी या महाशिवआघाडीला पाठींबा देऊ शकतात. अगदी रयत विकास आघाडीतील महाडिक गटही नव्या राजकीय समीकरणांची वाट तुडवू शकतो. अर्थात, या घडीला आमदार बाबर समर्थकांची या नव्या खिचडीबाबतची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे राज्यातील फॉर्म्युला जिल्ह्यात राबवलाच जाईल, असे ठामपणे सांगणे कठीण असेल. 

अध्यक्षपदाचे दावेदार 

जिल्हा परिषदेत सध्या भाजप - शिवसेना व अपक्षांची सत्ता आहे. या गटातून पाच महिला ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. त्यात तडसर (ता. कडेगाव) येथील शांता कनुंजे, दुधोंडी (ता. पलूस) येथील अश्‍विनी पाटील, आरग (ता. मिरज) येथील सरिता कोरबू, समडोळी (ता. मिरज) येथील शोभा कांबळे आणि म्हैसाळ (ता. मिरज) येथील प्राजक्ता कोरे यांच्यात चुरस लागू शकते. सध्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष असल्याने यावेळी संधी मिरजेला द्यावी लागेल, हे स्पष्ट आहे. त्यात आमदार सुरेश खाडे यांचे पारड जड राहू शकते, मात्र त्यांच्यापुढे कोरबू की कोरे असा पेच निर्माण होऊ शकतो. 

सध्याचे बलाबल असे -

एकूण जागा - 60

रिक्त जागा - 3 
सत्ताधारी - भाजप 25, शिवसेना 03, रयत आघाडी  04, घोरपडे गट 02 
विरोधक - राष्ट्रवादी 14, कॉंग्रेस 08, स्वाभिमानी  01  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com