रॅंचोला आली ही ऑफर, "सकाळ'मुळे उगवली पहाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मी सात महिन्यांपूर्वीच बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. मात्र, "सकाळ'मध्ये त्या बाबतची बातमी प्रसिद्ध होताच माझ्यावर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आज मी महाविद्यालयात हिरो असल्याच्या थाटात वावरत होतो.

शिर्डी ः ग्रामीण भागात राहून नवीन आविष्कार करणारा शिर्डीतील रॅंचो चांगलाच चर्चेत आला आहे. 
"सकाळ'ने त्याच्या कामगिरीची दखल घेतल्याने तो महाविद्यालयात अक्षरशः हिरो झाला. कालपर्यंत सामान्य असलेला वैभव गाडेकर अभिनंदनाच्या वर्षावात न्हाऊन निघत आहे. त्याच्या जीवनात आशेची पहाट उगवली आहे. दोन मोठ्या व्यावसायिकांनी त्याच्या या संशोधनाबाबत ऑफर दिली आहे. 

 

हेही वाचा  - भाजपची शिवसेनेला छोबीपछाड 

मित्रांनी केले स्वागत 
सकाळ तसेच ई-सकाळने वैभवची यशोगाथा प्रसिद्ध केली. पहाटेपासूनच त्याला अभिनंदनाचे फोन सुरू झाले. व्हॉटसअपवरून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सकाळी तो आपली सायकल घेऊन नेहमी प्रमाणे प्रवरा पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात गेला. प्रवेशद्वारावर त्यांच्या स्वागतासाठी मित्रांनी गर्दी केली होती. मित्रांचे स्वागत स्वीकारीत असतानाच प्राचार्यांनी त्याला सायकल घेऊन कार्यालयात बोलावले असल्याचा निरोप आला. 

प्राचार्यांनी केला सत्कार 
आपल्या मित्र मंडळींसह तो प्राचार्यांच्या कार्यालयाजवळ गेला. प्राचार्य दशरथ मगर व प्रा.धनंजय आहेर हे त्यांच्या सहकारी प्राध्यापकांसह कार्यालया बाहेर आले. त्यांनी वैभवचे स्वागत केले. बॅटरीवर चालणारी सायकल तयार करून तू महाविद्यालयाचे नाव केले, अशा शब्दांत प्राचार्य मगर यांनी त्याचे कौतुक केले. त्यानंतर त्याच्यासमवेत हे सर्वजण कार्यालयात गेले. पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून त्याचा सत्कार करण्यात आला. 

व्यापाऱ्यांनी बोलणी होणार 
दुपारी चारच्या सुमारास त्याला सायकल विक्री करणाऱ्या दोन मोठ्या व्यावसायिकांचे फोन आले. त्यांनी त्याच्याकडून व्यावसायिक तत्वावर बॅटरीवर चालणाऱ्या सायकल खरेदी करण्याची तयारी दर्शविली. या बाबत अंतिम बोलणी होणार असल्याची माहीती वैभवने सकाळला दिली. "सकाळ'मुळे माझ्या आयुष्यात एक वेगळा दिवस उगवला. मला व्यावसायिक तत्वावर या सायकली तयार करण्याची ऑफर मिळाली. आनंद व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. अशी प्रतिक्रिया वैभव याने दिली. 

हे सगळं सकाळमुळेच... 
मी सात महिन्यांपूर्वीच बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. मात्र, "सकाळ'मध्ये त्या बाबतची बातमी प्रसिद्ध होताच माझ्यावर सर्व बाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आज मी महाविद्यालयात हिरो असल्याच्या थाटात वावरत होतो. समोर दिसेल तो माझे अभिनंदन करीत होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This offer came to Rancho