एका मिनिटाची करामत, अधिकृत उमेदवारी पदरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पन्हाळा - राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कशी फिल्डिंग लावली जाते, ते अनेकांना ठाऊक आहे. मात्र उमेदवारीसाठी ए, बी फॉर्म मिळवून अर्ज दाखल करण्यात एक मिनिटाची आघाडी घेतलेल्या उमेदवारास अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळाली; तर एका मिनिटाच्या उशिरामुळे अधिकृत ऐवजी अपक्ष होण्याची वेळ कोडोली पूर्व गणातील तेजस्विनी शिंदे यांच्यावर आली. 

पन्हाळा - राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कशी फिल्डिंग लावली जाते, ते अनेकांना ठाऊक आहे. मात्र उमेदवारीसाठी ए, बी फॉर्म मिळवून अर्ज दाखल करण्यात एक मिनिटाची आघाडी घेतलेल्या उमेदवारास अधिकृत उमेदवार म्हणून मान्यता मिळाली; तर एका मिनिटाच्या उशिरामुळे अधिकृत ऐवजी अपक्ष होण्याची वेळ कोडोली पूर्व गणातील तेजस्विनी शिंदे यांच्यावर आली. 

जनसुराज्यशक्‍ती पक्षातर्फे ६ फेब्रुवारीला जयश्री जाधव यांनी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी अर्ज दाखल केला; तर तेजस्विनी शिंदे यांनी २ वाजून २१ मिनिटानी अर्ज दाखल केला. केवळ १ मिनिटाच्या फरकाने जयश्री जाधव यांच्या पदरात पक्षाची अधिकृत उमेदवारी पडली नि पक्षाने तेजस्विनी शिंदे यांचा अर्ज वैध ठरवावा, अशी मागणी करूनही त्यांना अपक्ष म्हणून उमेदवारी मिळाली.

दरम्यान पन्हाळा तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ६ गटासाठी ६५ उमेदवारांनी ९७ अर्ज दाखल केले होते. या सर्व ६५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. पंचायत समितीच्या १२ गणासाठी १०० उमेदवारांनी दाखल केलेल्या १४१ अर्जापैकी कोतोली गणातील अंजली कांबळे आणि गीता कांबळे यांच्या नावात बदल असल्याने तसेच एकीने प्रतिज्ञापत्र हजर केले नसल्याने त्यांचे ३ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे गणात ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. 

कोडोली पूर्व गणात जनसुराज्यशक्‍ती पक्षातर्फे जयश्री शिरीषकुमार जाधव आणि तेजस्विनी रणजित शिंदे यांनी जनसुराज्यशक्‍ती पक्षातर्फे अर्ज दाखल केले होते. या दोघीनाही पक्षाने एबी फॉर्म दिल्याने या दोन उमेदवारांपैकी कुणाची उमेदवारी अधिकृत धरावी, याचा खुलासा पक्षाने काल पर्यंत केलेला नव्हता. त्यामुळे या दोन उमेदवाराबाबत गोंधळ निर्माण झालेला होता. 

आज छाननीदरम्यान या गणातील उमेदवार शुभांगी सुनील पाटील यांच्यातर्फे प्रतिनिधी सुनील नामदेव पाटील यांनी हरकत घेऊन एका पक्षाने दोन उमेदवारांना नमुना २ अ व २ ब सूचनापत्र दिले असल्याने हे दोन्ही अर्ज अवैध ठरविण्यात यावेत, अगर नियमात तशी तरतूद नसल्यास दोन्हीपैकी प्रथम आलेला अर्ज वैध ठरवावा, अशी मागणी केली. 

निवडणूक निर्णय अधिकारी अजय पवार यांच्या समोर झालेल्या सुनावणीत जनसुराज्यतर्फे तेजस्विनी शिंदे यांनाच अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. त्यांचाच अर्ज वैध ठरविण्यात यावा, असे म्हणणे मांडण्यात आले. जयश्री जाधव यांनीही जनसुराज्यतर्फे तेजस्विनी शिंदे यांना पक्षाने ए, बी फॉर्म दिल्याने आपल्याला पक्षातर्फे निवडणूक लढवायची नसल्याने आपली उमेदवारी रद्द करावी, असे म्हणणे सादर केले. 

तथापि निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पवार यांनी विहित वेळेत पक्षाने कोणताही खुलासा न केल्याने जयश्री जाधव यांचे नामनिर्देशनपत्र प्रथम प्राप्त झाल्याने त्यांची पक्षातर्फे उमेदवारी वैध धरण्यात येत असल्याचा तसेच तेजस्विनी शिंदे यांना अपक्ष उमेदवार गृहीत धरून वैध करत असल्याचा आदेश दिला.

Web Title: Official nomination