आजीबाईंनी केली आयुष्यभराची कमाई विठुरायाचरणी अर्पण

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : केरसुण्या बनवणारी आजी आणि दूध, दही, ताक विकणाऱ्या माणिक आजीनंतर शेतात मोलमजुरी करणाऱ्या दुरपा आजीने वर्षानुवर्षे कष्ट करून साठवलेली आयुष्यभराची पुंजी विठुरायाच्या चरणी अर्पण केली.

एकीकडे पैशाच्या मागे सारे जग धावत असताना दुसरीकडे प्रामाणिकपणे कष्ट करून साठवलेले हजारो रुपये निस्वार्थ भावनेने देवाला देणगी देणारी अशी उदाहरणे समाजाला निश्चितच प्रेरणा देणारी आहेत. आजच्या काळात अशा सर्वसामान्य भाविकांने आणलेली लाख मोलाची देणगी आणि अपार श्रद्धा पाहून क्षणभर विठुराया सुद्धा अवाक होत नसेल का हो....

काही वर्षापूर्वी केरसुण्या बनवून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अत्यंत गरीब आजीबाईने कष्टातून साठवलेली आयुष्यभराची सारी पुंजी विठुरायाच्या चरणी अर्पण केली होती. सहा एप्रिल रोजी मालेगाव येथे दही दूध ताक विकणाऱ्या माणिकबाई सखाराम गवळी या सत्तरी ओलांडलेल्या आजीने रोज थोडे थोडे करून साठवलेली तब्बल एक लाख रुपयाची पुंजी विठ्ठलचरणी अर्पण केली.

काल अशीच माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील द्रोपदाबाई सोनबा खरात ही पंच्याहत्तरी ओलांडलेली आजी मंदिरात आली. या दुरपा आजीचे पती वृद्धापकाळामुळे आजारी असतात.अनेक वर्षे लोकांच्या शेतात शेळ्या राखून आणि शेतात मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या दुरपा आजीने रोज थोडे थोडे करत तब्बल पन्नास हजार रुपये विठुरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी नातेवाईक सुनील गोगरे याच्याकडे साठवले होते. ही सारी रक्कम त्यांनी देणगी म्हणून मंदिर समितीकडे सुपूर्त केली तेव्हा विठुरायाला देणगी देण्याचा संकल्प पूर्ण झाल्याने दुरपा आजी आनंदून गेल्या.

समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाद हे देखील आजी पुढे नतमस्तक झाले. त्यांनी आजी ना श्री रुक्मिणी मातेच्या प्रसाद म्हणून उत्तम साडी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी ची प्रतिमा भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी , 
ही संत तुकोबांची उक्ती आहे. त्याप्रमाणे काही व्यक्ती आपले सारे आयुष्य उत्तम व्यवहारातून धन मिळवतात‌. या धनाचा योग्य कारणाकरता म्हणजे धर्म कारणासाठी, समाजकारणासाठी अथवा परोपकारासाठी निर्मोही अंतकरणाने उपयोग करतात.

केरसुनी बनवणाऱ्या आजी असोत, दही दूध ताक विकून चार पैसे देवासाठी बाजूला ठेवणाऱ्या माणिक आजी असोत आणि शेतात मजुरी करणाऱ्या दुरपा आजी असोत समाजातील अशा व्यक्तींचा गौरव झाला पाहिजे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अशा आगळ्यावेगळ्या आणि खऱ्या अर्थाने दानशूर लोकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला पाहिजे असे मत संत तुकोबांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांनी सकाळ शी बोलताना व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com