कऱ्हाडजवळ कृष्णा नदीवरील पुल कोसळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

पूल पडला की पाडला...
जुन्या कृष्णा पुलाशेजारील नवीन पूल झाल्यावर जुना पूल पाडला जाणार अशी चर्चा आहे. त्याला विरोध करत नागरिकांनी कृष्णा पूल बचाव समितीची स्थापना केली. त्यांचा लढा सुरू आहे. अशा काळातच आज पूल पडल्याने नेमका पाण्याच्या प्रवाहानेच पडला, की पाडला याबाबतची चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावरही या चर्चेला ऊत आला आहे. पुलावर असणारी यंत्रणा नेमकी कशासाठी हा प्रश्‍नही उपस्थित झाला.

कऱ्हाड - येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाच्या मध्य भागाचा कमकुवत पिलर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने सुमारे ४० मीटर लांबीचा पूल कोसळला. दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने प्रशासनासह नागरिकांची तारांबळ उडाली. नव्या पुलाच्या कामासाठी प्रशासनाने १२ जुलैपासून या जुन्या पुलावरील वाहतूक बंद केली. त्यानंतर लगतच्या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

दरम्यान, पूल पडल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी वाढली. त्यातच शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळांमुळे वाहतूक कोंडीतही मोठी भर पडली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरूच होते. 

कऱ्हाड- विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर १९३९ मध्ये २७४ मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला. या ब्रिटिशकालीन पूल अनेक महापुरांचा साक्षीदार ठरला आहे. कमी उंचीचा हा पूल महापुरात पाण्याखाली जात असल्याने या पुलालगत केंद्रीय रस्ते निधीतून नव्याने उंच पूल उभारण्यात आला. त्यामुळे पूर्वी महापुरात जुना पूल पाण्याखाली गेल्यावर ओगलेवाडी, रेल्वे स्टेशन, टेंभू, कोरेगाव मार्गे कार्वे पुलावरून पर्यायी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीचा प्रश्‍न निकाली निघाला. मात्र नवीन पूल झाल्यापासून महापूरच आला नसल्याची 
स्थिती आहे. 

दरम्यान, काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री पूल वाहून गेल्यावर शासनाने ब्रिटिशकालीन पुलाच्या कामाची स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या वेळी कृष्णा पुलाचा एक पिलर कमकुवत झाल्याचा अहवाल बांधकाम विभागाने प्रशासनाला दिला होता. त्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला नाही.

मात्र विजापूर- गुहागर राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यावर नव्याने महामार्ग बांधणीच्या कामात या पुलाशेजारील नवीन उंच पुलाच्या उभारणीस मंजुरी मिळाली. त्यानुसार काही दिवसांपासून नव्या पुलाचे कामही सुरू झाले. या कामास अडथळा ठरू नये म्हणून जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. जुन्या पुलावरील वाहतूक १२ जुलैपासून बंद करून ती नव्या पुलावरून वळवत त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी वापरात होता.

आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास पावसाच्या सरी सुरू होत्या. त्या वेळी सैदापूर बाजूकडून पुलाच्या सातव्या क्रमांकाचा कमकुवत झालेला पिलर पाण्याच्या प्रवाहाने सरकून पुलाचे सुमारे ४० मीटर लांबीचे दोन गाळे कोसळले. विद्यानगरकडून कऱ्हाडकडे चालत येणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनी समोर हा प्रकार घडल्याने ती भीतीने मागे पळत सुटली. सुदैवाने दुर्घटना घडली नसली, तरी मासेमारी करणाऱ्यासह पुलाचे काम करणाऱ्या कामागारांनी मोठा आवाज झाल्याचे ऐकले. त्यातच पडलेल्या पुलाची छायाचित्रासह बातमी काही क्षणातच सोशल मीडियावर पसरताच नागरिकांनी पडलेला पूल पाहण्यासाठी गर्दी केली. त्यातच पाचच्या सुमारास बहुतेक शाळा, महाविद्यालये सुटल्याने पुलावर वाहतुकीची गर्दी झाली. बघ्यांची गर्दी व वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडली. अपुऱ्या पोलिसांच्या संख्येमुळे मोठी कसरत झाली. ये- जा करणारी वाहने नवीन पुलावरून पडलेला पूल पाहण्यास थांबत असल्याने वाहतूक कोंडीत वाढ झाली. त्यातच जुन्या पुलावरूनही पडलेला पूल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना पोलिसांना अडवताना दमछाक झाली. पडलेल्या गाळ्याचा बाजूचा गाळाही निसटला असून, नदीतील पाण्याच्या प्रवाहाने तो भागही पडतो, की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान १५ दिवसांपासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या निर्णयामुळे माठी हानी टळल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. 

पूल पडल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. नीलम येडगे, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सायंकाळनंतर जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनीही भेट देऊन पाहणी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Old Bridge Collapse in Karad Accident