दीडशे वर्षांपूर्वीच्या कोल्हापूरवर प्रकाशझोत

कोल्हापूर - क्रांतीवीर राजगुरू तरूण मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवात दाखविण्यात येणारा १८६७ ते १८७१ दरम्यानचा कोल्हापूर शहराचा नकाशा.
कोल्हापूर - क्रांतीवीर राजगुरू तरूण मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवात दाखविण्यात येणारा १८६७ ते १८७१ दरम्यानचा कोल्हापूर शहराचा नकाशा.

कोल्हापूर - पुराचा फटका बसणार नाही, असं तटबंदीत वसलेले कोल्हापूर शहर. तटबंदीबाहेर अनेक तलाव. जितीच्या नाल्याच्या परिसर झाडाझुडपांचा. सुमारे १८६७ ते १८७१ च्या कोल्हापूर शहराच्या नकाशात दिसणारी ही रचना. 

गणेशोत्सवात शहरवासीयांना शहराची ही रचना पुन्हा मोठ्या नकाशाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. यंदाच्या महापुरात शहराला आलेले बेटाचं स्वरूप पाहता दीडशे वर्षांपूर्वीच्या शहरावर जुना बुधवार पेठेतील क्रांतीवीर राजगुरू तरूण मंडळ प्रकाशझोत टाकणार आहे. सुपरवायझर डब्ल्यू. बी. रिक्‍स यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णाजी हरी यांनी शहर रचना लक्षात घेऊन हा नकाशा तयार केला आहे. 

बुधवार पेठेतील रविकिरण डांगे यांना त्यांचे आजोबा (कै.) धोंडीराम डांगे यांच्या कागदपत्रांत हा नकाशा आढळून आला. 

रंकाळा, वरूणतीर्थ, कुंभार, कळंबा, पद्माळे, महार तलाव, खराळ्याचा बंगला, आंबी, नाभिक, कुंभार लोकांच्या गल्ल्या, पंचगंगा घाट, पेरूची बाग, ब्रह्मपुरी, असे तटबंदीबाहेरचं शहर नकाशात पाहता येते. पंचगंगा नदी व जितीच्या ओढ्याचा प्रवाहही नकाशात दाखविला आहे. हाच नकाशा जाणीवपूर्वक नागरिकांसमोर आणण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे. याला कारण यंदाच्या महापुराने शहरात घातलेल्या थैमानामागे दडले आहे. पुराने पडलेली घरे, लोकांची अस्वस्थ मने, पुराच्या वेढ्यात अडकलेले पूरग्रस्त, पिकांचे झालेले नुकसान, हे महापुराचे रौद्र रुप भयभीत करणारे ठरले. त्याला मनुष्यनिर्मित कारणांची जोड असल्याचे तर्क काढले आहेत. या परिस्थितीत दीडशे वर्षांपूर्वीची शहराची रचना नकाशाच्याव्दारे नागरिकांनी पाहायला हवी, अशी चर्चा क्रांतीवीर राजगुरू तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांत झाली. 

रविकिरण डांगे यांना घरांतील जुन्या कागदपत्रांत सापडलेला नकाशाच गणेशोत्सवात दाखवू, असा विचार कार्यकर्त्यांतून पुढे आला आहे. त्यासाठी जाड भिंगांतून या नकाशातील बारीक-सारीक नावे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भिंग घेऊन तटबंदी व तटबंदीबाहेर असलेलत्या प्रत्येक वास्तू, तलावाचे नाव शोधले जात आहे. 

कार्यकारिणी अशी
अध्यक्ष - अनिकेत सुनील जठार, उपाध्यक्ष - स्वरूप गायकवाड, कार्याध्यक्ष - ऋषीकेश भांदिगरे, सचिव - संतोष मिठारी, खजिनदार - सौरभ बंगडे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com