सातारा : तांबवेतील जुना कोयना पूल कोसळला 

हेमंत पवार    
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

तांबवे गावाजवळून वाहणाऱ्या कोयना नदीवरील पूल आज बुधवारी पहाटे कोसळला. 38 वर्षे जुना असणारा हा पूल कमकुवत झाला होता. त्या पुलावरून अनेकदा पुराचे पाणी गेल्यामुळे आणि तब्बल आठ दिवसांपासून अधिक काळ पाण्याखाली राहिल्यामुळे आज पहाटे पूल कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.                                                

कराड : तांबवे गावाजवळून वाहणाऱ्या कोयना नदीवरील पूल आज (बुधवारी) पहाटे कोसळला. 38 वर्षे जुना असणारा हा पूल कमकुवत झाला होता. त्या पुलावरून अनेकदा पुराचे पाणी गेल्यामुळे आणि तब्बल आठ दिवसांपासून अधिक काळ पाण्याखाली राहिल्यामुळे आज पहाटे हा पूल कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, तांबवे गावाजवळून वाहणाऱ्या कोयना नदीवर 1981 साली पूल बांधण्यात आला होता. तत्पूर्वी गावाला बोटीशिवाय पर्यायच नव्हता. पुल झाल्यामुळे गाव तालुक्याशी जोडले गेले होते. पुलावरून परिसरातील दहा ते बारा गावे आणि वाड्यावर त्यांचा संपर्क व दळणवळण सुरू होती. 38 वर्षे  हा पूल आबालवृद्धांच्या सेवेत होता. मध्यंतरी या पुलाच्या पिलरला तडे गेले होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीस कमकुवत झाला होता.

मध्यंतरी मुसळधार पाऊस पडत होता. त्यातच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे त्या पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी घेतला. त्यानुसार तो पूल वाहतुकीस बंद केला होता. आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्याच्या फटक्याचा सामना पूल करत होता. आज पहाटे तो पूल कोसळला. पहाटेच्यावेळी ही घटना घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.   

ग्रामस्थांनी मानले सकाळचे आभार- तांबवे येथील पूल वाहतुकीस धोकादायक झाला असून, पिलर खचल्याबाबतची बातमी दैनिक सकाळने प्रसिद्ध केली होती.  महापुराच्या फाटक्यानंतर तांबवे पुलाची झालेली दुरावस्था दैनिक सकाळने मांडली होती. त्याच बरोबर पुलावरील वाहतूक धोकादायक बनल्याचेही प्रसिद्ध केले होते.  याबाबत ग्रामस्थांनी दैनिक सकाळचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old koyna bridge collapse on near tambve