जिल्ह्यात "माझे कुटुंब...'साठी साडेअकरा हजार पथके तयार - प्राजक्ता कोरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

राज्य सरकारच्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेसाठी जिल्ह्यात 11 हजार 428 पथके तयार करण्यात आली आहे. याआधी पन्नास वर्षावरील व्यक्तींचे सर्वेक्षण केले गेले. आता प्रत्येक व्यक्ती सर्वेक्षणाच्या कक्षेत असेल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे आणि आरोग्य सभापती आशा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

सांगली ः राज्य सरकारच्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेसाठी जिल्ह्यात 11 हजार 428 पथके तयार करण्यात आली आहे. याआधी पन्नास वर्षावरील व्यक्तींचे सर्वेक्षण केले गेले. आता प्रत्येक व्यक्ती सर्वेक्षणाच्या कक्षेत असेल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे आणि आरोग्य सभापती आशा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते. 

अध्यक्षा कोरे म्हणाल्या, ""कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा आता प्राधान्याचा विषय आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार या मोहिमेत प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाईल. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्‍टोबर पहिली फेरी आणि 12 ते 24 ऑक्‍टोबर दुसरी फेरी असेल. ग्रामीण भागातील 21 लाख 15 हजार, शहरी भागातील 2 लाख 9 हजार तर महापालिका क्षेत्रातील 5 लाख 32 हजार लोकांची तपासणी होईल. 5 लाख 71 हजार घरांना पथके भेट देतील. ताप, खोकला, सर्दी, जुनी दुखणी जाणून घेतली. कोणतीही लक्षणे नसताना संशयास्पद वाटणाऱ्या लोकांना आरोग्य केंद्रात बोलावून त्यांची रॅपीड अँटीजेन तपासणी करायला लावतील. त्यातून एक मोठा बाधित वर्ग समोर येईल, ज्यापासून धोका अधिक आहे.'' 

आरोग्य सभापती आशा पाटील म्हणाल्या, ""यासाठी 34 हजार 284 कर्मचारी नेमले आहेत. 1150 वैद्यकीय अधिकारी आहेत. आशा वर्कर्स यांच्यासोबत काही स्वयंसेवक नेमले जाणार आहेत.'' 
 

1.80 लाखाची बक्षिस योजना 

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी या मोहिमेत जे पथक अतिउत्तम काम करेल, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचून त्यातून बाधितांना शोधेल, त्यांच्यासाठी बक्षिस योजना जाहीर केली. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात दीड हजार, एक हजार आणि पाचशे रुपयांचे बक्षिस असेल. अशी एकूण 180 बक्षिसे असतील 1 लाख 80 हजार रुपयांचा निधी यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half thousand squads formed for "My Family ..." in the district - Prajakta Kore