अपहरणाचा बनाव केल्याने जाखलेतील एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कोडोली - व्यापार करताना घेतलेली दोन लाखांची उसनवार भागवण्यासाठी नातेवाइक व पत्नीकडून दोन लाख रुपये उचलण्याच्या हेतूने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या कृष्णात बबन घाटगे (वय 27, रा. जाखले, ता. पन्हाळा) यास कोडोली पोलिसांनी अटक केली.

कोडोली - व्यापार करताना घेतलेली दोन लाखांची उसनवार भागवण्यासाठी नातेवाइक व पत्नीकडून दोन लाख रुपये उचलण्याच्या हेतूने स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणाऱ्या कृष्णात बबन घाटगे (वय 27, रा. जाखले, ता. पन्हाळा) यास कोडोली पोलिसांनी अटक केली.

कृष्णात घाटगे सायंकाळी पाचच्या दरम्यान कासारवाडी-जाखले रस्त्यावरून मोटारसायकलवरून येताना तिघा अज्ञातांनी दोन लाखांसाठी त्याचे अपहरण केल्याची तक्रार पत्नी पूनम घाटगे यांनी बुधवारी (ता. 25) दिली. अपहृताचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख महादेव तांबडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा व शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोडोलीचे स.पो.नि. विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक शाम देवणे, संदीप बोरकर, स. फौ. एकनाथ गावडे, विठ्ठल बहीरम, श्रीकांत शिंदे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांचे पथक नेमले.

तपासात कृष्णात घाटगे याने आपले तिघांनी अपहरण केले असून, संशयितांनी मारहाण करून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले आहे व ते दोन लाख रुपयांची मागणी करीत आहेत, असा फोन पत्नीला केला. याची माहिती पथकाला मिळताच विकास जाधव यांनी त्याचे मोबाईल लोकेशन शोधले. ते आंबा, निळे गाव परिसरात दिसून आले. रात्री माउंटन हॉटेलजवळील पेट्रोल पंपाजवळ घाटगे याची मोटारसायकल आढळली, तर काही अंतरावर घाटगे झुडपात लपलेला दिसला. पोलिसांनी चौकशी केली असता तिघांनी मोटारीतून अपहरण करून दोन लाखांची मागणी केली होती. ती मिळण्याच्या आशेने संशयित मद्यपान करीत असताना मी तेथून पसार झालो व येथे लपल्याचे सांगितले.

दरम्यान, त्याच्या माहितीत तफावत जाणवू लागल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. खाक्‍या दाखवल्यानंतर त्याने खरी हकिकत सांगितली. जनावरांच्या व्यापारात उसनवार झाल्याने ती देण्याकरिता अपहरणाचा बनाव केल्याचे त्याने सांगितले.

Web Title: one arrested