मध्यरात्रीच्या सुमारास एकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सुनील गर्जे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

आत्महत्येपूर्वी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गोंडे हे भेंडे येथे चौकात आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत होते. त्यानंतर काहीवेळातच ते आपल्या घरी गेल्यावर मध्यरात्री घरातून पळत जाऊन थेट विहिरीत उडी घेतली.

 नेवासे : भेंडे (ता. नेवासे) येथील बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे (वय-37) या शेतकऱ्यांने रविवारी (ता. 24) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच नेवासेचे तहसीलदार रुपेश सुराणा व पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पोलिस पुढील तपास करीत आहे. 

याबाबत माहिती अशी, की नेवासे तालुक्‍यातील भेंडे खुर्द येथील भेंडे-गोंडेगाव रस्त्यावरील गोंडे वस्तीवर राहणारे बाळासाहेब गोंडे यांनी रविवारी घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

वेळेत मदत न मिळाल्याने मृत्यू

आत्महत्येपूर्वी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गोंडे हे भेंडे येथे चौकात आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत होते. त्यानंतर काहीवेळातच ते आपल्या घरी गेल्यावर मध्यरात्री घरातून पळत जाऊन थेट विहिरीत उडी घेतली. त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊही त्यांच्या पाठीमागे धावत गेले. भावाने आरडाओरडा करून इतरांना एकत्र केले. मात्र, रात्रीचा अंधार आणि पाण्याने भरलेली विहीर यामुळे गोंडे यांना वाचवण्यासाठी वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयत बाळासाहेब गोंडे यांच्या पश्‍चात आई-वडील, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One committed suicide by jumping into the well around midnight