कोल्हापूर : राजेंद्रनगरात हवालाच्या १ कोटी १८ लाखांची लूट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना अर्धनग्न अवस्थेत बांबवडे व आंबा परिसरात सोडून दिले. 

कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना अर्धनग्न अवस्थेत बांबवडे व आंबा परिसरात सोडून दिले. 

हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आला. तशी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. लुटीमागे आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याची शक्‍यता आहे. लुटारूंचा चार पथकांद्वारे शोध सुरू झाला. राजारामपुरी पोलिसांत याबाबतचा गुन्हा नोंद  झाला. याबाबतची फिर्याद हवालाचे कर्मचारी चिंतामणी भगवान पवार (वय २४, रा. एैनवाडी, ता. खानापूर, सांगली, सध्या रा. राजेंद्रनगर) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, भेंडे गल्ली परिसरात 
लक्ष्मी गोल्ड गुलीयन नावाची कंपनी आहे. ही कंपनी किशोर शिंदे व विकास कदम यांच्या मालकीची आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, केरळ आदी ठिकाणी सोने खरेदी-विक्रीचे काम ही कंपनी करते. कंपनीत सुशांत लक्ष्मण कदम (२१), सागर बाळासाहेब सुतार (२५) आणि चिंतामणी भगवान पवार (२२, सर्व रा. आटपाडी, ता. सांगली, सध्या रा. राजेंद्रनगर) हे तिघे नोकरीस आहेत.

काल (ता. १४) मुंबईहून व्यापाऱ्यांकडे सोने खरेदी विक्री करत पहाटे कोल्हापुरात आले. त्यांच्या मोटारीत त्यावेळी २ किलो वजनाचे सोने व ५२ लाखांची रोकड होती. ते सर्वजण राजेंद्रनगर येथील घरात जात होते. दरम्यान, साडेचारच्या सुमारास राजेंद्रनगर परिसरात एका मोटारीत लुटारू दबा धरून बसले होते. त्यांनी कंपनीच्या मोटारीच्या आडवी मोटार घालून ती थांबवली. कंपनीची मोटार थांबल्याबरोबर तिघे लुटारू बाहेर आले. त्यांनी कंपनीच्या मोटारीवर दगडफेक केली. त्यातील एकाच्या हातात सुरा होता. त्याचा धाक दाखवत त्यांनी कंपनीच्या मोटारीचा दरवाजा उघडला. त्या लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशांत कदम यांच्या डोक्‍यात सुरा मारून त्यांना जखमी केले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जखमी सुशांतसह, सागर सुतार व चिंतामणी पवार हे तिघे घाबरून गेले. लुटारू सुऱ्याचा धाक दाखवून जबरदस्तीने कंपनीच्या मोटारीत बसले. त्यानंतर ती मोटार घेऊन लुटारू कोल्हापूर रत्नागिरीच्या दिशेने गेले. रस्त्यात बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे चिंतामणी, सुशांत यांना मोटारीतून उतरवले. त्यापूर्वी त्यांच्या अंगावरील शर्ट पॅन्टसह मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते आंब्याच्या दिशेने पुढे गेले. त्यांच्या मोटारीत सागर सुतार हे एकटेच होते. त्यामुळे ते घाबरले होते. मात्र, लुटारूंनी त्यांना आंबा परिसरात उतरवले. त्यांचे कपडेही त्यांनी सुरुवातीला काढून घेतले होते; पण त्यानंतर कपडे पुन्हा त्यांना परत केले. त्यानंतर ते रत्नागिरीच्या दिशेने मोटार घेऊन पसार झाले. याबाबत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १ कोटी १८ लाख १ हजार २०० रुपये लुटीची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली. 

बांबवडेत उतरवलेल्या कर्मचाऱ्यांनी तेथील पोलिस चौकीशी संपर्क साधला. त्यानंतर कंपनीच्या मालकांना याची माहिती दिली. त्यानंतर मालकांनी हा प्रकार राजारामपुरी पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी लुटारूंच्या शोध मोहिमेसाठी चार पथकांची नियुक्ती केली. त्यानुसार लुटारूंचा शोध सुरू झाला. याबाबत परिसरातील सीसीटीव्हीआधारे लुटारूंची शोधमोहीम सुरू केली आहे. 

कर्मचाऱ्यांना साधला पोलिसांनी संपर्क
लुटारूंच्या टोळीच्या तावडीत सापडलेले हवालाच्या तीन कर्मचाऱ्यांपैकी पवार व कदम या दोघांना बांबवडे येथे अर्धनग्न अवस्थेत सोडले. तिसरा कर्मचारी सुतार यांना आंबा (शाहूवाडी) येथे सोडले. पवार व कदम यांनी अशाच अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना हा प्रकार सांगितला. तेथील एकाच्या फोनवरून हवालाच्या मालकाशी संपर्क साधला. तेथून बांबवडे येथील पोलिस चौकीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. 

टीपचा संशय
हवालाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने व पैशाची वाहतूक होते, याची माहिती घेऊन ‘रेकी’ करून ही लूट टोळीने केली असावी. अगर कोणीतरी याची टीप लुटारूंना दिली असावी. हे कृत्य करणारी आंतरराज्य टोळी असावी, असा संशय पोलिसांना आला आहे. त्यानुसार पोलिसांचा तपासही सुरू झाला आहे.

नाकाबंदी...
लुटारूंच्या टोळीच्या शोधासाठी शाहूवाडी, रत्नागिरी, सिंधूदुर्गसह कोकण, कर्नाटक आदी ठिकाणच्या पोलिस यंत्रणेशी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपर्क साधला. त्यानंतर टोळीच्या शोधासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. तसेच मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्याचे पोलिसांकडून सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one cores 18 lakh looted in Rajendranagar Kolhapur