एक दिवस मोफत वैद्यकीय सेवा 

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

डॉ. आव्हाड यांनी 30 वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात पहिले आयुर्वेदिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. तेथे देश-विदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. आजवर काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सुमारे दीड हजार आयुर्वेदिक डॉक्‍टर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव घेऊन गेले आहेत. 

शिर्डी ः साईबाबांच्या सेवाभावापासून प्रेरणा घेत गेल्या 18 वर्षांपासून साईसंस्थानाच्या रुग्णालयात दर गुरुवारी रुग्णांना मोफत आयुर्वेदिक वैद्यकीय सेवा देत असल्याचे, दिल्ली आयुर्वेद विद्यापीठाच्या राष्ट्रीय आयुर्वेद गुरू उपाधीने सन्मानित डॉ. रामदास आव्हाड यांनी सांगितले. 

डॉ. आव्हाड यांनी 30 वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात पहिले आयुर्वेदिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. तेथे देश-विदेशातील रुग्ण उपचारासाठी येतात. आजवर काश्‍मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे सुमारे दीड हजार आयुर्वेदिक डॉक्‍टर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव घेऊन गेले आहेत. 

आयुषसाठी स्वतंत्र मंत्रालय 
आयुर्वेद उपचारपद्धतीच्या वाढत्या महत्त्वाबाबत डॉ. आव्हाड म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदिक उपचारपद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरू केले. या विभागाचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुर्वेद जगभरात नेण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली. त्याचे फलित म्हणून युरोपीय देशांसह जगभरातील 58 देशांनी आयुर्वेद उपचारपद्धती स्वीकारण्यास मान्यता दिली. एका अर्थाने आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला. योग व आयुर्वेद, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. ही बाब पंतप्रधान मोदी यांनी जागतिक व्यासपीठावरून जोरकसपणे मांडली.'' 

आयुर्वेदाबाबत उत्सुकता 
""पुढारलेल्या अनेक देशांत आयुर्वेदाबाबत उत्सुकता निर्माण झाली. अनेक आजारांवर या उपचारपद्धतीने आश्‍चर्यकारक परिणाम मिळतात. आजार होऊच नयेत, यासाठी आपली दैनंदिनी कशी असावी, तसेच आहार-विहार आणि निद्रा यांचे महत्त्व आयुर्वेद सांगतो. पुढारलेल्या देशांतील रुग्ण आयुर्वेद उपचारासाठी मोठ्या संख्येने भारतात येतात. 58 देशांनी या उपचारपद्धतीस मान्यता दिली. त्यामुळे यापुढे आयुर्वेदिक डॉक्‍टरांना (वैद्य) या देशांत मोठी मागणी असेल. शुद्ध आयुर्वेदिक उपचार करणारी सुपर स्पेशालिटी रुग्णालये आणि या उपचारपद्धतीचे लाभ लक्षात घेऊन लोक मोठ्या संख्येने आयुर्वेद उपचाराला प्राधान्य देत आहेत,'' असे डॉ. आव्हाड म्हणाले. 

स्वतंत्र व सुसज्ज विभाग सुरू करावा 
डॉ. रामदास आव्हाड म्हणाले, ""साईसंस्थानाने आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी स्वतंत्र व सुसज्ज विभाग सुरू करावा, तेथे संशोधन केंद्र असावे, या क्षेत्रातील जाणकार वैद्य व संशोधकांसाठी ते खुले असावे, देशभरातील अनुभवी आयुर्वेदिक डॉक्‍टरांना येथे निमंत्रित करावे. देश-विदेशात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी शिर्डीला वेगळे महत्त्व आहे.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One day free medical care