थरारक ! ओढ्यात वाहून गेलेल्या बोलेरोतील एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ओढ्यातून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेलेल्या बोलेरो गाडीतील एकाचा मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.

अकलूज : ओढ्यातून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेलेल्या बोलेरो गाडीतील एकाचा मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.

बुधवारी (ता. 23) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात मृत्यू झालेले गाडीत मागच्या सीटवर बसले होते. त्यांना गाडीतून काडण्याच्या प्रयत्न झाला मात्र, जागेवरच नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या गाडीत तिघेजण प्रवास करत होते. दोघांवर अकलुज येथे उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद वेळापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. 

शंकरनगर- अकलूज येथील शिवरत्न कंट्रक्‍शन कंपनीतील कामगार दसुर तालुका माळशिरस येथून खळवे येथे जात होते. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे बहुतांश ओढ्यांना पाणी आले आहे. नंदा चा ओढा या ओढ्यावरील खळवे येथे नवीन पुलाचे काम सुरू आहे. वाहतुकीला पर्याय म्हणून मोठ्या मुलाच्या शेजारुन तात्पुरत्या स्वरूपात ओढा ओलांडण्याची सोय केली आहे. या तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्या पाण्याचा अंदाज चालकाला आली नाही. त्यामुळे बोलेरो गाडी पाण्यातून नेताना वाहत गेली. यावेळी गाडीमध्ये सोमनाथ झपके (वय, 48, रा. अकलूज), व्यवस्थापक नरसिंह करडे व गाडीचालक सिद्धाराम बिराजदार हे तिघे प्रवास करत होते.

गाडी पाण्यातून वाहून जात असताना नवीन पुलावर काम करणाऱ्या कामगारांनी व गावकऱ्यांनी पहिली. त्यांनी शिताफीने प्रयत्न करून गाडीतील तिघांना बाहेर काढले. परंतु सोमनाथ झपके हे मागील सीटवर असल्याने त्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. पाणी नाकातोंडात गेल्यामुळे त्याचा गाडीतच मृत्यू झाला. वाचलेल्या दोघांना उपचारासाठी अकलूज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताची नोंद वेळापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in flood at Solapur district aklooj