सात फेऱ्याला आडवा कोरोनाचा फेरा, नेवाशात १२५ लग्नाळूंच्या स्वप्नांचा चुराडा

सुनील गर्जे
रविवार, 5 एप्रिल 2020

मार्चनंतर आता एप्रिलही हातचा चालल्याने त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. एकट्या नेवासा तालुक्यात सव्वाशे लग्न लांबली आहेत. त्या लग्नाळूंसोबत वधू-वर पित्यांचेही टेन्शन वाढले आहे. त्यांचे आता मे किंवा जूनमधील शुभ तारखेच्या शोधात आहेत.

नेवासे : जगभरातील सर्वच क्षेत्रांत कोरोनाचे पडसाद नकारात्मक पद्धतीने उमटले. तसेच विवाहबंधनात अडकू इच्छिणाऱ्या वागदत्त वधू-वरांच्या मखमली स्वप्नांचा कोरोनाने चुराडा केला आहे. सात फेरे घेण्याअगोदर हा रोगाचा फेरा आल्याने ते हवालदिल झाले आहेत. मार्चनंतर आता एप्रिलही हातचा चालल्याने त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली आहे. एकट्या नेवासा तालुक्यात सव्वाशे लग्न लांबली आहेत.

त्या लग्नाळूंसोबत वधू-वर पित्यांचेही टेन्शन वाढले आहे. त्यांचे आता मे किंवा जूनमधील शुभ तारखेच्या शोधात आहेत. नेवासे तालुक्‍यात असलेल्या अठ्ठावीस मंगल कार्यालयांत एप्रिल महिन्यात 116 लग्न होणार असल्याची माहिती मंगल कार्यालय संचालकांनी दिली. यातील जवळपास 112 नियोजित लग्नांची तारीख रद्द होऊन आता मे किंवा जूनमध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एप्रिल महिन्यात 15, 16, 17, 18, 19, 26 व 27 या तारखांना मोठी तिथी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आपसूकच चौदा एप्रिलच्या आतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द झाले. विशेष म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची तयारी पाहता ता. 14 एप्रिलनंतरही आणखीन काही दिवस लॉकडाऊन राहील, अशी सद्यःस्थिती आहे. चौदा एप्रिलनंतर लॉकडाऊन न झाल्यास मे महिन्यातील नियोजित लग्न होण्याची शक्‍यता पुरोहितांनी व्यक्त केली. 

मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द, ऍडव्हान्स घेतले परत

आपले लग्न किंवा आपल्या घरातील आप्तस्वकियांचे लग्न धूमधडाक्‍यात व्हावे, अशी इच्छा सर्वांचीच असते. त्याकरिता घरातील सगळे सदस्य एकत्र बसून विविध नियोजन करतात. लग्नाची तारीख नियोजित झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या परिसरातील आलिशान मंगल कार्यालय घ्यायची धडपड सर्वांचीच असते. अशीच धडपड एप्रिल महिन्यात लग्नाळू वधू-वर व त्यांच्या माता-पित्यांची होती.

बहुतांश जणांनी नेवासे तालुक्‍यात असलेले विविध मंगल कार्यालय बुकिंग करून ठेवले होते. पण एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी सर्वप्रथम बुक केलेली तारीख रद्द केली, तसेच दिलेली ऍडव्हान्स रक्‍कमही परत घेतली. याच पार्श्वभूमीवर व्हिडिओ, फोटोग्राफर, मंडप कॉन्ट्रॅक्‍टर, ब्यूटी पार्लर यांसह इतर जणांचेही बुकिंग रद्द केले आहे. 

बुकिंग रक्कमही परत केली
"मार्च आणि एप्रिलमध्ये एकूण नऊ-दहा लग्नांकरिता आमचे मंगल कार्यालय बुकिंग होते. मार्चमधील सगळी नियोजित लग्न रद्द झाली आहेत. आता एप्रिलमधील सात-आठ लग्नदेखील रद्द झाली. बुकिंग रक्कमदेखील परत केलेली आहे. मे किंवा जूनमध्ये नियोजित लग्न होतील, अशी आशा आहे. 
- अमोल अभंग, 
संचालक, साईश्रद्धा मंगल कार्यालय, कुकाणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred and twenty-five marriages were postponed in Nevasa