सांगलीत शंभर बेडचे कॅन्सर केअर सेंटर

जयंत पाटील जीवन ज्योत ट्रस्टच्या हॉस्पिटलचे भूमिपूजन
जयंत पाटील
जयंत पाटीलsakal

सांगली: आरोग्य सेवेला महत्त्व देत नवनवीन योजना आखल्या जात आहेत. जीवन ज्योत ट्रस्टच्या वतीने सांगलीत अत्याधुनिक शंभर बेडचे कॅन्सर केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी कोणताही पैसा महापालिका खर्च करणार नाही. यामाध्यमातून शहरासह जिल्ह्यातील गरजूंना माफक दरात उपचार केले जाणार आहेत. याचा सांगलीकरांना नक्कीच फायदा होईल, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

येथील शिवशक्ती क्रीडांगणाजवळ महानगरपालिका आणि जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टतर्फे उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, ट्रस्टचे संस्थापक हरखचंद सावला, मीना मारू, निर्मला सावला, शमीका नाडकर्णी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर गीता सुतार, मैनुद्दीन बागवान, शेखर माने, सुब्राव मद्रासी, विजय घाडगे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.

जयंत पाटील म्हणाले, ‘कोरोनामध्ये आरोग्य सेवा दर्जेदार करण्यासाठी प्राधान्याने काम केले. राज्यात दुसरी कोरोना चाचणी प्रयोगशाळा मिरजेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणली. त्यामुळे निदान करणे सोपे झाले. महापालिकेतर्फे मिरजेतील किसान चौकात महिला आणि लहान मुलांसाठी सुसज्ज हॉस्पिटल होत आहे. तसेच, सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शंभर खाटांचे आणखी रुग्णालय होत आहे. याशिवाय कुपवाड, डिग्रजजवळ रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामाध्यमातून लोकांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यानिमित्ताने आरोग्यसेवा बळकट होईल.’ ट्रस्टचे संस्थापक सावला म्हणाले, ‘गेल्या ३८ वर्षांपासून मुंबईत ट्रस्टतर्फे कार्य केले जात आहे. सांगलीतून अनेक रुग्णांना उपचार करण्यात आले. म्हणूनच सांगलीत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय उभारण्यात येत आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हे रुग्णालय काम करेल. त्याचा सांगलीकरांना फायदा होईल.’

महापालिकेच्या ॲपचे अनावरण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून घरपट्टी, पाणीपट्टीसह अनेक सुविधा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. तसेच, तक्रारी ही नोंदवल्या जाणार आहे. उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी आभार मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमापूर्वीच उद्‌घाटनाची भाजपची सवय

हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार, नगरसेवक यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी कोणीही याठिकाणी आले नसल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमापूर्वीच उद्‌घाटन करण्याची भाजपची सवय आहे, असा टोला त्यांनी लगावला. लोकहिताच्या कार्यक्रमांसाठी पक्षभेद न मानता एकत्रितपणे यायला हवे, असा सल्लाही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com