आणखी एक डॉक्‍टर ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मिरज - शेकडो भ्रूणांची हत्या करण्यासाठी डॉ. खिद्रापुरे याने मोठे जाळे तयार केल्याचे आता तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिरोळ तालुक्‍यातून आणखी एका डॉक्‍टरला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र, अद्याप त्याला अटक दाखवलेली नाही. गर्भपात करताना मरण पावलेली स्वाती जमदाडे हिचा पती प्रवीण जमदाडेला न्यायालयाने आणखी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

मिरज - शेकडो भ्रूणांची हत्या करण्यासाठी डॉ. खिद्रापुरे याने मोठे जाळे तयार केल्याचे आता तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिरोळ तालुक्‍यातून आणखी एका डॉक्‍टरला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले. मात्र, अद्याप त्याला अटक दाखवलेली नाही. गर्भपात करताना मरण पावलेली स्वाती जमदाडे हिचा पती प्रवीण जमदाडेला न्यायालयाने आणखी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

दरम्यान, गर्भपातासाठी डॉ. खिद्रापुरेला गोळ्या पुरवणारा सुनील खेडेकर ज्या कुरिअर कंपनीमार्फत वाहतूक करीत होता, ती कंपनी चौकशीच्या रडारवर आहे. म्हैसाळमधील भ्रूणहत्याप्रकरणी आतापर्यंत स्वाती जमदाडेचा पती, तीन डॉक्‍टर, एक औषध पुरवठादार आणि सात एजंटांना अटक झाली आहे. या सर्वांकडून रोज नवनवीन माहिती पोलिसांना मिळत आहे. सध्या तपासाची सूत्रे सांगलीच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे या हाताळत असल्यामुळे त्यांनी तपास पद्धतीमध्ये थोडेफार बदल केले आहेत. या प्रकरणात एजंटांशिवाय कोणत्या डॉक्‍टरचा कितपत सहभाग आहे, यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. एजंटांचीही कसून चौकशी सुरू आहे. 

या प्रकरणी आज आणखी एका डॉक्‍टरला शिरोळ तालुक्‍यातून ताब्यात घेण्यात आले. त्याची माहिती त्यांनी दिली नसली तरी संबंधित गावाच्या परिसरात मात्र या डॉक्‍टरच्या कारनाम्यांचा बोलबाला असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने डॉ. खिद्रापुरेकडे आणखी किती महिला गर्भपातासाठी पाठविल्या किंवा या डॉक्‍टरचा प्रकरणाशी किती आणि कसा संबंध आहे? याची खात्री करूनच त्याला अटक केली जाणार आहे. 

वैद्यकीय नोंदणी रद्द - डॉ. फुंदे 
म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी कायद्यातील तरतुदीनुसार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची वैद्यकीय नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई यांनी घेतला. त्यासाठी परिषदेची समिती सखोल चौकशी करेल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित फुंदे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले, ""म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या घटनेची परिषदेने गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाचा अहवाल येण्यापूर्वीच खिद्रापुरे यांची वैद्यकीय नोंदणी निलंबित केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार योग्य प्रक्रियेचा अवलंब करून खिद्रापुरे यांची नोंदणी कायमस्वरूपी रद्दचा निर्णय घेतला आहे. पोलिस किंवा इतर यंत्रणेच्या अहवालाची वाट न पाहता परिषदेने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती म्हैसाळ व सांगलीत चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल परिषदेला सादर करेल. त्यानंतर नोंदणी परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि कायद्यानुसार आवश्‍यक ती कारवाई या आठवड्यात केली जाईल.'' 

Web Title: one more doctor arrested