यंत्रमागधारकांना वीज दरात मिळणार एक रुपयाची सवलत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

यंत्रमाग वीज ग्राहकांना १ रुपये, सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. तसेच सूतगिरण्यांना ३ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. दोन दिवसांत निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

इचलकरंजी - राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०१८ ते २३ अंतर्गत आमदार सुरेश हाळवणकर यांच्या एकसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून वस्त्रोद्योगातील साधे यंत्रमागधारक, सहकारी सूत गिरण्या तसेच सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट व इतर घटकांना वीज दरात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे यंत्रमाग वीज ग्राहकांना १ रुपये, सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट, आधुनिक यंत्रमाग ग्राहक व इतर घटकांना २ रुपये प्रतियुनिट अधिकची सवलत मिळेल. तसेच सूतगिरण्यांना ३ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. दोन दिवसांत निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

राज्याचे वस्त्रोद्योग धोरण १५ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये जाहीर केले आहे. धोरणांतर्गत वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज दरात सवलत जाहीर केली होती. काल (ता. १२) या शासन निर्णयाचा मसुदा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी हाळवणकर यांच्याकडे दिला. प्रथमच सूत गिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, निटिंग तसेच गारमेंट व इतर प्रकल्पांना सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे या उद्योग घटकांना नागपूर वस्त्रोद्योग संचालक यांच्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

नोंदणीची वेबसाईट दोन-तीन दिवसांत सुरू होणार आहे. यंत्रमाग वीज ग्राहकांना पूर्वीपासूनच सबसिडी देण्यात येत असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची नोंदणी करण्याची गरज नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री बावनकुळे, सहकार पणन वस्त्रोद्योग मंत्री देशमुख आदींच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्देशानंतर हा निर्णय दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे.

आता साध्या यंत्रमागधारकांना ३.७७ रुपये सबसिडी 
राज्यातील साध्या यंत्रमागधारकांना वीज दरात शासन पूर्वीपासून २.७७ रुपये सबसिडी देते. रकमेत वाढ करून ३.७७ रुपये केली आहे. त्याचबरोबर २०० अश्‍वशक्तीच्या पुढे वीजभार असणाऱ्या आधुनिक यंत्रमाग ग्राहकांनासुद्धा सवलत मिळणार आहे.

Web Title: One rupee rebate will be given to the power consumers