दाऊद भाईंचा चहा ए वन...

संदीप खांडेकर
बुधवार, 25 जुलै 2018

कोल्हापूर - ‘जीने की राह आसान है! 
तो हर मोड पर क्‍यों रुकना
तू चलता चल जिंदगी का सफर
तेरी राह में मिलेंगे हजारो हमसफर,’ 

कोल्हापूर - ‘जीने की राह आसान है! 
तो हर मोड पर क्‍यों रुकना
तू चलता चल जिंदगी का सफर
तेरी राह में मिलेंगे हजारो हमसफर,’ 
या संदेशावर दाऊद बाबालाल पाटणकर चालत आहेत. वडिलांचा चहा टपरीच्या व्यवसायाचा वारसाही चालवत आहेत. सायंकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत यांच्या टपरीवर गर्दी ठरलेली असते. प्रेमळ स्वभावामुळे या माणसाच्या गाडीवर चहा प्यायला येणाऱ्यांची कमतरता नाही. विशेष म्हणजे महाविद्यालयीन युवक, ज्येष्ठ नागरिक ते पोलिस कर्मचाऱ्यांना दाऊद भाईंच्या चहाने आकर्षित केले आहे. या चहा टपरीचे नाव ‘ए वन टी’ स्टॉल असे जरी असले, तरी ‘बावडेकर’ चहा नावानेच ही टपरी अजून ओळखली जाते. 

बाबालाल पाटणकर हे मूळचे गगनबावडा येथील. तेथून पोटापाण्यासाठी ते कोल्हापुरात आले. त्यांनी लक्ष्मीपुरीतील चांदणी चौकात भाड्याच्या घरात संसार मांडला. पद्मा चित्रपटगृहाच्या चौकात चहा टपरीचा व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुली व दोन मुले. पाटणकर यांचे एकत्रित कुटुंब. त्यामुळे चहाच्या टपरीवर सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा दाऊद याने या व्यवसायाची सूत्रे हाती घेतली आहेत. यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले. शेलाजी वन्नाजी विद्यालय व नेहरू हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, मात्र कुटुंबाचा आकार मोठा असल्यामुळे त्यांनी व्यवसायातच लक्ष घातले. 

या व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला आहे. दररोज चहासाठी सुमारे ३० लिटर दूध लागते, असे ते सांगतात. केवळ पाच तास चहाचा व्यवसाय करत कुटुंबासाठी पुरेसे उत्पन्न मिळते, असेही ते सांगतात. 

पहाटे पाच वाजता त्यांच्या दिवसाची सुरवात होते. अल्लाहवर निस्सीम प्रेम करणारे दाऊद दिवसा पाच नमाज पडतात. त्यासाठी ते कामातून वेळ काढतातच. त्यांचा मोठा मुलगा उजेफा बारावीला असून, दुसरा मुलगा मोईन दहावीपर्यंत शिकला आहे. दोघेही वडिलांना मदत करण्यासाठी टपरीवर दररोज हजेरी लावतात. मुलगी मुस्कान हिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचा भाऊ अमीन याची मध्यवर्ती बस स्थानक परिसरात भेळीची गाडी आहे.

‘मला माझ्या व्यवसायात समाधान आहे. लोक प्रेमाने माझ्याकडे चहा प्यायला येतात, हेच माझे भांडवल आहे.’ 
- दाऊद पाटणकर

Web Title: A One Tea Stall Dawood Patankar